
Mumbaikars Expensive House Dreams : गरिबातील गरिबाला घर खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागू शकता? तुम्ही म्हणाल फार फार तर 3 लाख रुपये अथवा 6 लाख रुपये. पण मुंबईतील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यात मुंबई महापालिकेने अत्यल्प उत्पन्न गाटातील लोकांसाठी घर बांधण्याच्या योजनेचा श्रीगणेशा केला आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तीला या घरासाठी थोडेथोडके नव्हे तर 1 कोटी 7 लाख रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. आता या महागड्या घरांसाठी असा कोणता गरीब बोली लावणार हा खरा प्रश्न आहे.
मुंबईकरांचे घराचे स्वप्न ‘महाग‘
मुंबई महापालिकेने अत्यल्प उत्पन्न गटातील घर चक्क 1 कोटी 7 लाखांना विक्री करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. सिडको आणि म्हाडाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने (BMC) पहिल्यांदाच 426 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. मात्र, अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांची ही अव्वाच्या सव्वा किंमत पाहुन अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तीचा उर दबला. या घरांसाठी 1 कोटींहून अधिक रक्कम मोजणारा गरीब सर्वांनाच आता पाहायचा आहे. त्याचीच अधिक उत्सुकता आहे. बीएमसी असा कोणता गरीब माणूस उभा करते याचीच अधिक चर्चा होत आहे.
270 चौरस फुटांच्या घरासाठी 1 कोटी
महापालिकेच्या या लॉटरीत, भायखळ्यातील फक्त 270 चौरस फुटांच्या घरासाठी 1 कोटी 7 लाख रुपयांची विक्री किंमत निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे कांजुरमार्ग येथील 450 चौरस फुटांच्या घराची किंमतही 98 लाख ते 1 कोटींच्या घरात आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. विक्री किंमत निश्चित करतानाच पालिकेच्या डोकेबाज अधिकाऱ्यांनी अजून कहर केला आहे. तो वाचला तर सर्वसामान्य माणूस डोके झोडून घेतल्याशिवाय राहणार नाही.
घराची किंमत 1 कोटी, उत्पन्न मर्यादा 6 लाख
पालिकेने अत्यल्प उत्पन्न गटाच्या घराची किंमत 1 कोटी 7 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. या घरांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नाची मर्यादा ही त्यांनी निश्चित केली आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांच्या वर नको अशी अट घातली आहे. राजा उदार झाला नि हाती भोपळा दिला असा हा अजब कारभार आहे. कारण घराची किंमत निश्चित करण्यापूर्वी आणि उत्पन्न मर्यादेची अट घालण्यापूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी कोणत्या बँकेशी सल्लामसलत केली हाच मोठा प्रश्न आहे. 50 हजार मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला कोणती बँक गृहकर्जासाठी इतके कर्ज देईल असा प्रश्न विचारल्या जात आहे.
रेडिरेकनरमुळे किंमती भडकल्या
घरांच्या किंमती त्या-त्या भागातील शीघ्रगणक दर (Ready Reckoner Rate) आणि त्यावर 10 टक्के प्रशासकीय खर्च जोडून निश्चित करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील रेडी रेकनर दर 30,000 रुपये प्रति चौरस फूट असल्याने येथील घरांची किंमत 1 कोटींपेक्षा अधिक आहे. या घरासाठी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2025 या कालवधीत अर्ज सादर करता येतील. तर या घरांसाठी 20 नोव्हेंबर रोजी सोडत होईल.