Pakistan Gold Rate : सोन्याची भारतात दीड लाखांकडे घोडदौड; पाकिस्तानमधील किंमत ऐकून हैराण व्हाल
Pakistan Gold Rate : भारतात सोन्याने सव्वा लाखांचा टप्पा कधीचाच ओलांडला आहे. आज जळगाव सराफा बाजारात सोने जीएसटीसह 1 लाख 31 हजारांच्या घरात पोहचले. पण पाकिस्तानमधील सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे का?

भारतात सोन्याच्या किंमतींनी सव्वा लाखांचा टप्पा कधीचाच ओलांडला आहे. सोन्याची घोडदौड आता दीड लाखांकडे सुरू झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 31 हजार रुपायांच्या घरात पोहचला आहे. पण पाकिस्तानमधील सोन्याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? कराची, इस्लामाबाद, लाहोर या शहरात एक तोळा शुद्ध सोन्याचा भाव वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
तीन शहरातील किंमतींना मोडला उच्चांक
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. तर दुसरीकडे राजधानी इस्लामाबाद आणि लाहोर या शहरातही सोन्याच्या किंमती भडकलेल्या आहेत. पाकिस्तान अगोदरच आर्थिक संकटातून जात आहे. कर्जासाठी हा देश सध्या अमेरिकेच्या दारात उभा आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर लष्कराचा वरचष्मा आहे. येथे पेट्रोल-डिझेलच नाही तर रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती सुद्धा गगनाला भिडलेल्या आहेत.
कराचीमध्ये 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव पाकिस्तानी रुपयात 4,42,700 रुपये आहे
लाहोरमध्ये 24 कॅरेट एक तोळा सोने 4,42,750 रुपयांना आहे
तर राजधानी इस्लामाबादमध्ये एक तोळा सोने 4,42,800 रुपये किंमतीला आहे.
कराचीत 22 कॅरेट एक तोळा सोने 3,63,827 रुपये, 18 कॅरेट सोने 2,97,677 रुपये
लाहोरमध्ये 22 कॅरेट एक तोळा सोने 3,63,827 रुपये, 18 कॅरेट सोने 2,97,677 रुपये
इस्लामाबाद 22 कॅरेट एक तोळा सोने 3,95,919 रुपये,18 कॅरेट सोने 3,23,933 रुपये
पाकिस्तानमध्ये का वाढतायेत किंमती?
पाकिस्तानमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यामागे अनेक कारणं आहेत. पाकिस्तान रुपया सातत्याने घसरत आहे. देशात महागाईचे मोठे संकट आ वासून आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा व्यापार हा डॉलरमध्ये होतो. पाकिस्तानी रुपया घसरल्याने खरेदीसाठी अधिक पैसा द्यावा लागतो. यामुळे पाकिस्तानमध्ये सोने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. वाढत्या किंमतींमुळे एक वर्ग सोडला तर सर्वसामान्य नागरिकांनी पाकिस्तानमधील सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसते. खाण्या-पिण्याचाच प्रश्न बिकट झालेला असताना सोने खरेदी करणे कुणाला परवडणार असा सवाल करण्यात येत आहे.
भारतीय रुपया आणि पाकिस्तानी रुपयाची तुलना
दोन्ही देशात विनियम हा रुपयात होत असला तरी त्यात फरक आहे. भारतीय रुपया पाकिस्तान रुपयापेक्षा मजबूत आहे. भारतीय एक हजार रुपये पाकिस्तानमधील 3,190 रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजे भारतीय एक हजार रुपयांसाठी पाकिस्तानी नागरिकांना 3,190 रुपये खर्च करावे लागतील.
