
BMC Mayor lottery on Jan 22: मुंबई महापौर पदाचा महापौर कोण? यावरून खल सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेंच सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा महापौर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज, 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत निघेल.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला यामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे बीएमसीत बाजीगर ठरतील. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे शिवसेनेचा महापौर होईल हे उद्धव ठाकरे यांचे वाक्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जर खरंच देवाच्या मनात आले तर मुंबईचा पुढील महापौर हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा होईल असे दिसते.
पक्षीय बलाबल असे
बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या आहेत. आता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा खिशात घातल्या आहेत. सर्वाधिक 89 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 227 सदस्यांच्या बीएमसीमध्ये 114 जागांचं मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. अशावेळी महायुतीचा महापौर बसवण्याची हालचाल सुरू असतानाच उद्धव सेनेसाठी आजचा दिवस भाग्यकारक ठरू शकतो.
तर मुंबई महापौर पदाची उद्धव सेनेला लॉटरी
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण सोडत आज गुरुवारी 22 जानेवारी रोजी निघेल. ही प्रक्रिया आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात होईल. आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात येऊ शकते. पण मुंबईत महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झाले तर परिस्थितीत पूर्णपणे पालटून जाईल. जर एसटी प्रवर्गाची आरक्षण सोडत निघाली तर मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खरी लॉटरी लागेल. कारण उद्धव सेनेकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक आहे.
तर दुसरीकडे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप आणि त्याचा मिक्षपक्ष शिंदेसेनेकडे अनुसूचीत प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ST प्रवर्गाचे दोन नगरसेवक आहेत. BMC प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वाळवी तर प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे हे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमत नसतानाही मुंबई महापौरपद आपसूकच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळेल. पण खुल्या प्रवर्गातून चक्राकार आरक्षण सुरू केल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौर पद मिळणे अशक्य वाटत आहे. पण जर एसटी प्रवर्गाला आरक्षण सुटले तर मात्र ठाकरे सेनेला बहुमत नसताना लॉटरी लागेल हे ही तितकेच खरे आहे.
अजून एक शक्यता
शिंदे सेना आणि भाजपमध्ये सध्या महापौर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत भाजप आणि शिंदेसेनेच ताणलं तर भाजपपुढे दुसरा पर्याय हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. उद्धव सेनेला एक वर्ष महापौर पद देऊन पुढील चार वर्षे भाजपकडे महापौर पद राहू शकते. कारण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या एक वर्षापूरते महापौर पद उद्धव सेनेला देऊन तोडगा काढला जाऊ शकतो. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षांसाठी महापौर पदावर दावा ठोकला आहे.