RSS कॅम्पसमध्ये नेणार BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल, त्यासाठी खर्च करणार इतके कोटी
महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल नेण्याचं नियोजन आहे.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल नेण्याचं नियोजन असून BMC त्यासाठी 2.46 कोटींचा खर्च करणार आहे. RSS शी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका शाळेतील 30 हजार 714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल नेण्यात येणार आहे. उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा BMC ने निर्णय घेतला आहे. सहलीसाठी महापालिका तब्बल 2.46 कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रति विद्यार्थी सुमारे 802 रुपये खर्चाचा अंदाज आहे. पर्यावरण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली एकदिवसीय सहल आयोजित करण्यात येणार आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी केशवसृष्टीची निवड केल्याने त्यावर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. केशवसृष्टीच्या अधिकृत माहितीनुसार, हा कॅम्पस RSS संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीला समर्पित आहे. कॅम्पसमध्ये पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन, मधमाशीपालन, औषधी वनस्पती आणि कचरा व्यवस्थापनासंबंधी उपक्रम राबवले जातात.
2.46 कोटींच्या प्रस्तावावर आता स्थायी समितीत चर्चा
सहली दरम्यान महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन, बायोगॅस, गांडूळ खत, पेपर आणि प्लास्टिक रिसायकलिंग, जलव्यवस्थापन, सौरऊर्जा आणि जैवविविधतेचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातील. याच कॅम्पसमध्ये राजकीय आणि नेतृत्व प्रशिक्षणाशी संबंधित संस्थाही कार्यरत आहेत. 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी RSSशी संबंधित ठिकाणाची निवड का? असा सवाल उपस्थित होण्याची शक्यता आहे. BMC कडून मात्र पर्यावरण आणि शैक्षणिक उद्देशानेच निवड केल्याचा दावा करण्यात आला आहे. 2.46 कोटींच्या प्रस्तावावर आता स्थायी समितीत चर्चा होणार आहे. प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी स्थायी समितीकडून खर्च आणि ठिकाणाची निवड याची छाननी होईल.
