सावधान, रविवारी घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा,मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांना रविवारचा दिवस म्हणजे लोकलने प्रवास करायचा असल्यास त्रासदायक ठरत असतो. कारण दर रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे लोकल उशीराने धावत असल्याने प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागतो.

सावधान, रविवारी घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा,मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
sunday mega block news
| Updated on: Jan 30, 2026 | 8:19 PM

मुंबईकरांना रविवारी घरातून बाहेर पडताना मेगाब्लॉकचे टाईम टेबल पाहूनच निघावे लागणार आहे. कारण या रविवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मुख्य मार्गावर

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ०३.४० वाजेपर्यंत ब्लॉक संचालित राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्ध-जलद लोकल फेऱ्यांना ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

या लोकल फेऱ्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील, तसेच सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ०३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/ अर्ध-जलद लोकल फेऱ्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.या फेऱ्या त्यांच्या नियोजित थांब्या व्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.या लोकल फेऱ्या सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल- एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान ५ व्या मार्गिकेवरून वळविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि दादर येथे येणाऱ्या अप मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे -विक्रोळी दरम्यान ६ व्या मार्गावरून वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील वाहतूक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. मुंबई,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ वा.ते दुपारी ३.३६ वा.दरम्यान वाशी-बेलापूर -पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या तसेच पनवेल-बेलापूर -वाशी येथून सकाळी १०.१७ वा. ते दुपारी ३.४७ वा. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला तसेच पनवेल-वाशी भागात विशेष उपनगरीय लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वा. या वेळेत ठाणे-वाशी आणि नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.