Chandrayaan 3 | पृथ्वीला एक चंद्र, पण गुरु ग्रहाला 95 पेक्षा जास्त चंद्र, सौरमंडळात अनेक रहस्य
पृथ्वीचा एक चंद्र आहे. मात्र गुरुला 95 हून जास्त चंद्र कसे काय? आजवर किती ग्रहांच्या कक्षेत मानवनिर्मित यानं पोहोचली आहेत? चंद्रयान मोहिमेच्या निमित्तानं सूर्यमालेविषयी सविस्तर माहिती सांगणारा 'टीव्ही 9 मराठी'चा स्पेशल रिपोर्ट!
मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : पृथ्वीवर इंच-इंच जमिनीसाठी खून पडतात. कोर्ट-कचेरी वर्षानुवर्ष आणि जमीन-जुमल्याचे वाद पिढ्यानपिढ्या चालतात. पण या पृथ्वीचं ब्रह्मांडातलं अस्तित्व काय? हे निरखून पाहिलं तर आपण का आणि कशासाठी भांडतोय? हा प्रश्न जरुर पडेल. आजपर्यंत ज्या अत्याधुनिक टेलिस्कोपनी वेगवेगळ्या ग्रह-तारे-गॅलक्सींचा शोध घेतलाय. त्याचंच एक प्रातिनिधीक दृश्यं आमच्या स्पेशल रिपोर्टच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. आपल्या सौरमंडळात अनंत ग्रह-तारे आहेत जे आपल्यापासून लाखो प्रकाशवर्ष दूर आहेत आणि पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची आपली आकाशगंगा, ज्याला आपण मिल्कि वे म्हणतो.
पण ही एकच आकाशगंगा नाहीय, अशा पुन्हा लाखो-खरबो आकाशगंगा ब्रह्माडांत असण्याचा अंदाज आहे. तूर्तास आपण ब्रह्मांडाला किती ओळखलंय. अंतराळात मानव कुठपर्यंत पोहोचलाय, ते समजून घेण्यासाठी आपलं सौरमंडळ समजून घेऊयात.
सौरमंडळाचा केंद्रबिंदू असलेला हा सूर्य. सूर्यानंतरचा पहिला ग्रह मर्क्युरी म्हणजे बुध. दुसरा ग्रह शुक्र अर्थात व्हिनस. सूर्यापासूनचा तिसरा ग्रह आपली पृथ्वी चौथा ग्रह मंगळ म्हणजे मार्स. सूर्यापासूनचा पाचवा ग्रह गुरु म्हणजे ज्युपिटर. नंतर शनि ग्रह म्हणजे सॅटर्न, नंतर अरुण म्हणजे युरेनस, त्यानंतर येतो आठवा ग्रह तो नेपच्यून.
सूर्याजवळचा पहिला ग्रह बुध हा सूर्यापासून 5 कोटी 80 लाख किलोमीटर दूर आहे. बुधवर कोणतंही वातावरण नाही. त्याचा आकार आपल्या चंद्राहून थोडासा मोठा आहे.
शुक्राचा आकार जवळपास पृथ्वीइतकाच
दुसरा ग्रह शुक्र. त्याचं सूर्यापासूनचं अंतर 10 कोटी 82 लाख 8 हजार 930 किलोमीटर इतकं आहे. शुक्राचा आकार जवळपास पृथ्वीइतकाच आहे. पृथ्वीवरुन उघड्या डोळ्यांनी आपण शुक्राला पाहू शकतो. शुक्र स्वतःभोवती फिरायला 243 दिवस घेतो. म्हणजे तुम्ही जर शुक्रावर 9 महिने राहिलात तरी तिथला एक दिवस संपलेला नसेल. शुक्राचं वैशिष्ठ्य म्हणजे सौरमंडळातला हा एकमेव ग्रह आहे जो इतर ग्रहांपेक्षा उलट्या दिशेनं फिरतो. म्हणून शुक्रावर सूर्य पश्चिमेतून उगवतो आणि पूर्वेला मावळतो.
तिसरा ग्रह पृथ्वी. ज्याबदद्ल आपल्या साऱ्यांना माहिती आहे. सूर्यापासूनचं पृथ्वीचं अंतर जवळपास 14 कोटी 95 लाख 97 हजार 890 किलोमीटर आहे. हा एकमेव ग्रह जिथं सजीवसृष्टी आहे.
मंगळावर वातावरण, मात्र पुरेसा ऑक्सिजन नाही
चौथा ग्रह मंगळ. सूर्यापासूनचं अंतर 22 कोटी 79 लाख 36 हजार 640 किलोमीटर. मंगळावर वातावरण आहे, मात्र पुरेसा ऑक्सिजन नाही. गोठलेल्या अवस्थेत इथं बर्फ आहे, काही शास्रज्ञ असंही मानतात की कधी-काळी मंगळावर जीवसृष्टी असावी. मंगळ स्वतःभोवती 24 तास 36 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. पण सूर्याभोवती फिरायला 687 दिवस घेतो. म्हणजे आपण जर मंगळावर गेलो, तर दोन वर्षात एकदाच वाढदिवस येईल आणि पृथ्वीवरच्या पन्नास वर्षांचा व्यक्ती मंगळावर फक्त 25 वर्षांचा असेल.
गुरु हा वायुंचा गोळा
सूर्यापासूनचा पाचवा ग्रह गुरु. सौरमंडळातला सर्वात मोठा ग्रह. हा ग्रह इतका मोठा आहे की याच्यात शेकडो पृथ्वी सामावू शकतात. याचं सूर्यापासूनचं अंतर 77 कोटी 84 लाख 12 हजार 10 किलोमीटर इतकं आहे. याला गॅस जायंटही म्हणतात. कारण हा वायुंचा गोळा आहे. इथे रंगीबेरंगी पट्टे आहेत, ते वेगवेगळ्या वायूंचे थर आहेत. या ग्रहावर जो रेडस्पॉट आहे, ते इथं शेकडो वर्षांपासून सुरु असलेलं वादळ आहे, हे वादळ इतकं मोठं आहे, ज्यात एक पृथ्वी बसू शकते. या ग्रहाला 40 हून जास्त चंद्र आहेत.
शनी ग्रह आकारानं दुसरा मोठा ग्रह
सूर्यापासूनचा सहावा ग्रह शनी. शनी ग्रह आकारानं दुसरा मोठा ग्रह आहे. पण तो ओळखळा जातो त्याच्याभोवती असलेल्या कड्यांमुळे. शनिच्या रिंग वास्तवात धुळ-छोटे-छोटे तुकडे आहे. असं म्हणतात शनिच्याच एका चंद्राच्या स्फोटानंतर शनिभोवती या रिंग तयार झाल्या. त्याचं सूर्यापासूनचं अंतर 1 अब्ज 42 कोटी 67 लाख 25 हजार 400 किमी इतकं आहे. शनिदेखील वायूग्रह आहे आणि शनिलाही अनेक चंद्र आहेत, त्यापैकी एका चंद्राचं नाव टायटन असं आहे.
सूर्यमालेतील सातवा ग्रह म्हणजे युरेनस. त्याचं सूर्यापासूनचे अंतर 2 अब्ज 87 कोटी 9 लाख 72 हजार 200 किलोमीटर इतकं आहे. हा सर्वात थंड ग्रह आहे. जिथलं तापमान मायनस 224 डिग्रीपर्यंत खाली येतं.
आतापर्यंत मानवी मोहिमांनी सूर्य, बुध, गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून या ग्रहांचा बऱ्यापैकी अभ्यास केलाय. शनि आणि गुरु ग्रहाचे जवळून फोटो, तिथलं वातावरण नासाच्या व्हायजर 1 मिशनमुळे शक्य झाले. थोडक्यात मानवनिर्मित उपकरणांनी आठही ग्रहांपर्यंत मजल मारलीय. नासाचं व्हायजर यान हे पृथ्वीपासून सर्वाधिक लांब असलेली एकमेव मानवनिर्मित वस्तू आहे.
ब्रह्मांडात जर कुठे एलियन असेलच तर त्यांना पृथ्वीवर मानवी वस्ती आहे, याचा शोध लागावा म्हणून नासानं व्हायजर मिशन आखलंय. थोडक्यात मानवाची पोहोच आतापर्यंत सूर्यापासून 4 अब्ज कोटी किलोमीटर लांबपर्यंत गेलीय आणि ब्रह्मांड अनादी अनंत आहे.

