मुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग सीटवर, मास्क बांधून मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना

| Updated on: Apr 07, 2020 | 2:45 PM

उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ परिसरातील चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Uddhav Thackeray Drives car wearing Mask)

मुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग सीटवर, मास्क बांधून मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता. (Uddhav Thackeray Drives car wearing Mask)

सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते, यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असले तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे. राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ परिसरातील चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चहावाल्याच्या संपर्कातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, तर काही पोलिसांनाही विलग ठेवण्यात आलं आहे.

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे. (Uddhav Thackeray Drives car wearing Mask) मुख्यमंत्री बहुतांश काम ‘मातोश्री’तूनच पाहतात. ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याला काल प्रकृतीचा त्रास झाल्याने संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली होती. ‘मातोश्री’च्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर कालपासूनच सील करण्यात आला आहे.

चहावाल्याच्या संपर्कातील चौघांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे चारही जण चहावाल्याच्या इमारतीत राहणारे आहेत. चहावाल्याकडे गेलेल्या पोलिसांसह 150 पोलिस आणि एसआरपीएफच्या जवानांना वांद्र्याच्या उत्तर भारतीय संघ भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले टाकली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला परिसर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केला आहे. चहावाल्याच्या टपरीपासून जवळच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचेही घर आहे. या भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही वर्दळ असते.