“सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असेल तर हे भयानक”; काँग्रेस नेत्याकडून सरकारवर गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे राज्यातील सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असेल तर हे भयानक; काँग्रेस नेत्याकडून सरकारवर गंभीर आरोप
| Updated on: Feb 21, 2023 | 6:06 PM

मुंबईः खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून आता राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रारीवरून आता विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सत्तेतील लोकांचा विरोधकांना संपवण्याचा डाव असे तर हे भयानक असल्याची टीका नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे.

महाराष्ट्रात या प्रकाराचे राजकारण कधीच नव्हते, मात्र आताच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी ही परिस्थिती महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची शक्यता आहे अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना सत्ताधारी लोकांची विरोधकांना संपवण्याची मानसिकता असल्याचे म्हटले आहे. या प्रकारचं राजकारण फुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.

नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधताना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रकरणाची सरकारने गांभीराय्ने चौकशी करण्याची गरज असल्याची मागमी केली आहे. या प्रकारे नेत्यांना संपवण्याचा डाव होत असेल तर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या जीवे मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे राज्यातील सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विरोधक आणि समर्थक या दोघांनीही संजय राऊत यांच्यावर मत व्यक्त केले असले तरी भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्या असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तर संजय राऊत यांच्या विरोधकांनी नरेश म्हस्के, प्रतोद भरत गोगावले यांनी या प्रकरणावरून सडकून टीका केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात  यावरून राजकारण तापणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.