Dilip Walse Patil: पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण, दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 17, 2022 | 2:15 PM

Dilip Walse Patil: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिचं समर्थन केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सदाभाऊंनी आधी समर्थन केलं.

Dilip Walse Patil: पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण, दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रपती पदाच्या निर्णय पवारसाहेब आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील दिलीप वळसे पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (ncp) महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यानी मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीने या प्रकरणाच्या चौकशीची आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. भाजपच्या (bjp) पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होणारच. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल. पोलीस दुसरी बाजू बघतील. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी असतील तर कारवाई करतील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार की नाही? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचं कारण नाही. पोलीस आयुक्त परवानगी देतील. घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी सभा घ्याव्यात, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर खोदून काढा असा इशारा मनसेने दिला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. याबाबत कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत. ते योग्य ती कारवाई करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

विकृत प्रवृत्तीचं समर्थन नको

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिचं समर्थन केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सदाभाऊंनी आधी समर्थन केलं. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. मूळातच विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये. या महिलेवर 17-18 प्रकारचे गुन्हे आहेत. त्यामुळे तिची मानसिकता अशीच दिसते. असाच प्रकारचं कृत्य करण्याचं यातून दिसून येत. अशी वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे खोत यांनी भूमिका बदलली असले, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन

दरम्यान, भाजप नेत्या स्मृती ईराणी काल एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या. त्यामुळे इंधनाच्या मुद्द्यावरून त्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आमनेसामने आल्याचं चित्रं निर्माण झालं. काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.