मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाण्यापूर्वी वाचा ही नियमावली, या लोकांना गणरायाच्या दर्शनासाठी बंदी
Siddhivinayak Temple Dress Code: मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक विधी दरम्यान योग्य कपडे परिधान केल्याने केवळ आपल्या सभ्यतेलाच नव्हे तर आपल्या उर्जेला देखील योग्य बळ मिळते. त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाताना सुसंस्कृत कपडे घालावेत, असभ्य कपडे घालू नयेत.

Siddhivinayak Temple Dress Code: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर गणेश भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त येत असतात. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरात पुढील आठवड्यापासून लहान स्कर्ट किंवा छोटे कपडे घालणाऱ्या भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यासंदर्भात मंदिर प्रशासनाने प्रवेश द्वारावरच एक बॅनर लावून भक्तांना आवाहन केले आहे. त्यात छोटे तोकडे कपडे घालून मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
का घेतला हा निर्णय
सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने सांगितले की, भक्तांनी सभ्य आणि शरीर झाकणारे कपडे परिधान करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यापासून छोटे किंवा अनुचित कपडे घालणाऱ्या भक्तांना प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात ड्रेस कोडचा निर्णय इतर भक्तांना अस्वस्थ वाटणाऱ्या अनुचित कपड्यांविषयी अनेक तक्रारी आल्यानंतर घेण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार फाटलेल्या किंवा कट असलेल्या पँट, लहान स्कर्ट किंवा असे कपडे ज्यामध्ये शरीराचे भाग उघडे राहतात अशा पोशाखातील भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारला जाईल.
देशभरातून हजारो भक्त दररोज मंदिरात येतात आणि अनेक भक्तांनी अशा कपड्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती, जे त्यांना पूजास्थळी अनुचित वाटतात. त्यामुळे ड्रेसकोडचा निर्णय घेण्यात आला. भक्तांकडून सतत विनंत्या प्राप्त झाल्यानंतर मंदिराची पवित्रता कायम राखण्यासाठी हा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिरात का हवा ड्रेस कोड?
मंदिरात ड्रेस कोड का हवा याबाबत बोलताना ज्योतिषाचार्य पंडित विनोद गौतम पंडितजी म्हणतात की, आपल्या भारतीय संस्कृतीत कपड्यांचे खूप महत्त्व आहे. मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक विधी दरम्यान योग्य कपडे परिधान केल्याने केवळ आपल्या सभ्यतेलाच नव्हे तर आपल्या उर्जेला देखील योग्य बळ मिळते. त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाताना सुसंस्कृत कपडे घालावेत, असभ्य कपडे घालू नयेत.
या ठिकाणी ड्रेस कोड
श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यापूर्वी देशातील 6 प्रसिद्ध मंदिरांच्या ट्रस्ट आणि प्रशासनाने या मंदिरांमध्ये ड्रेस कोड जारी केला आहे. या मंदिरांमध्ये घृष्णेश्वर महादेव मंदिर, तिरुपती बालाजी, महाबळेश्वर मंदिर, गुरुवायूर कृष्ण मंदिर, महाकाल मंदिर यांचा समावेश आहे.
