Iqbal Mirchi Properties : दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील 500 कोटींच्या प्रॉपर्टीवर ED ची कारवाई
Ed attach Iqbal Mirchi Properties : सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन ही प्रॉपर्टी जवळपास 4970.41 चौरस मीटर जवळपास 1.2 एकरमध्ये पसरलेली आहे. याआधी PMLA कायद्याखाली ईडीने ही प्रॉपर्टी जप्त केली होती.

दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि ड्रग्स तस्कर इक्बाल मिर्चीशी संबंधित वरळीतील तीन इमारती ED ने जप्त केल्या आहेत. सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन जप्त केलेल्या इमारतींची नावे आहेत. या इमारती समुद्रकिनारी असून त्या मालमत्तांची किंमत जवळपास 500 कोटी रुपये आहे. या मालमत्ता 1986 मध्ये भागीदारी फर्ममार्फत खरेदी करून ट्रस्टच्या नावावर ठेवण्यात आल्याचा ED चा दावा. सर मोहम्मद युसुफ ट्रस्ट हा केवळ फ्रंट म्हणून वापरल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. 2005 मध्ये चुकीची माहिती देत या मालमत्ता अटॅचमेंटमधून मुक्त करून घेतल्याचाही आरोप. विशेष PMLA न्यायालयाने मिर्चीच्या कुटुंबाला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करत मालमत्ता जप्तीला मंजुरी दिली.
सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन ही प्रॉपर्टी जवळपास 4970.41 चौरस मीटर जवळपास 1.2 एकरमध्ये पसरलेली आहे. याआधी PMLA कायद्याखाली ईडीने ही प्रॉपर्टी जप्त केली होती. पण आता FEO कायद्यांतर्गत पुन्हा प्रॉपर्टी जप्त करण्यास परवानगी दिली आहे. एकेकाळी या तीन इमारतींचा प्लॉट समुद्राला लागून होता. आता मिर्चीचे हे प्लॉट समुद्र महाल या आलिशान इमारतीच्या शेजारी आहेत. आरोपी फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर झाला असेल तर FEO कायद्यांतर्गत त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी जास्त अधिकार मिळतात. त्या प्रॉपर्टीचा लिलावही करता येतो.
जुहूच्या मीना हॉटेलचा प्लॉट
मागच्या तीन महिन्यात ED ने FEO कायद्यांतर्गत इक्बाल मिर्ची आणि त्याच्याशी संबंधितांच्या अनेक प्रॉपर्टीज जप्त केल्या आहेत. यात बंद असलेल्या जुहूच्या मीना हॉटेलचा प्लॉट आहे. 448 चौरस मीटरमध्ये ही प्रॉपर्टी पसरलेली आहे. महाबळेश्वरमधील एक फार्महाऊस आहे. या जप्त केलेल्या संपत्तीचं पुढे काय करायचं ते ईडी लवकरच जाहीर करणार आहे. कदाचित ईडीकडून इतक्या साऱ्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जाऊ शकतो.
2013 साली लंडनमध्ये मृत्यू
इक्बाल मिर्चीचा 2013 साली लंडनमध्ये मृत्यू झाला. स्पेशल कोर्टाने त्याची पत्नी हजरा आणि त्याची दोन मुलं असीफ, जुनैद यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. FEO कायद्यांतर्गत त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी सुद्धा ईडीने अर्ज दिला आहे.