दाऊदच्या निकटवर्तीयाशी जमीन व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

| Updated on: Oct 13, 2019 | 12:23 PM

दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी निगडीत जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

दाऊदच्या निकटवर्तीयाशी जमीन व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर
prafull patel
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या रडारवर (ED Probes Praful Patel Land Deal) आहेत. पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत कंपनीने दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी निगडीत ‘मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘मिर्ची’च्या कुटुंबाशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे. मुंबईत वरळी भागात असलेल्या नेहरु प्लॅनेटोरियमजवळ मोक्याची जागा होती. हा प्लॉट मिर्चीच्या कुटुंबाकडून पटेल यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ‘मिलेनियम डेव्हलपर्स’ कंपनीला देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ईडी या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

या प्लॉटवर ‘मिलेनियम डेव्हलपर्स’ने पंधरा मजली ‘सीजे हाऊस’ ही इमारत बांधली. ही व्यावसायिक आणि रहिवासी इमारत आहे. मुंबई आणि बंगळुरुमध्ये गेले दोन आठवडे केलेल्या छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीने हे दावे केले आहेत. या प्रकरणी ईडीने 18 जणांचा जबाब घेतला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रंही ईडीने सील केली आहेत.

ईडी भेट रद्द, शरद पवारांनी सांगितलेली 2 कारणे

इकबाल मेमन मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय मानला जातो. त्याची पत्नी हजरा मेनन हिच्या नावे वरळीत एक प्लॉट आहे. ईडीला (ED Probes Praful Patel Land Deal) सापडलेल्या कागदपत्रांमध्ये प्लॉटच्या पुनर्विकासासाठी हजरा आणि मिलेनियम डेव्हलपर्समध्ये झालेल्या या कराराचा समावेश आहे.

2006-07 या कालावधीमध्ये हा करार झाला होता. सीजे हाऊसमधील दोन मजले 2007 मध्ये मेमन कुटुंबाला हस्तांतरित केल्याचाही यामध्ये उल्लेख आहे.

14 हजार चौरस फूटावर बांधलेल्या या दोन मजल्यांची किंमत दोनशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी भागीदार आहेत. त्यामुळे पटेल कुटुंबाला स्पष्टीकरण देण्यासाठी ईडीकडून बोलावणं येऊ शकतं, असंही म्हटलं जात आहे.