ठाकरे ब्रँड आहे, माझा थेट सामना…; अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले

Sada Sarvankar on Amit Thackeray : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वाधिक चर्चित असणाऱ्या मतदारसंघापैकी एक म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघ... या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. सदा सरवणकर विरूद्ध अमित ठाकरे अशी लढत होणार आहे. वाचा सविस्तर...

ठाकरे ब्रँड आहे, माझा थेट सामना...; अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले
एकनाथ शिंदे
Image Credit source: Facebook
| Updated on: Oct 24, 2024 | 2:54 PM

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिममधून निवडणूक लढत आहेत. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात अमित ठाकरे निवडणूक लढणार आहेत. सदा सरवणकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात. उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचेही आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने जिंकेल असं मला विश्वास आहे, असं सदा सरवणकर म्हणालेत.

“ठाकरे ब्रँड पण..”

अमित ठाकरे काय बोलले हे मला माहित नाही. उमेदवार कोणी असू द्या, कारण देशात लोकशाही आहे. लोकशाहीतून प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे. पण त्यांच्या जागी एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असेल तर मला जास्त आनंद झाला असता. ठाकरे ब्रँड निश्चितच आहे. त्यांचा माझा थेट सामना आहे. त्यामुळे मी माझं स्वतःचं हे भाग्य मानतो, असं सदा सरवणकर म्हणालेत.

अमित ठाकरेंना शुभेच्छा

दादरच्या जनतेला लोकांच्या दारापर्यंत घरापर्यंत जाणारा नेता हवा आहे. ना की नेत्यांच्या घरी त्यांना जाण्याची वेळ येईल, असा नेता हवाय. त्यामुळे दादरची जनता माझ्यासोबत आहे. मला एवढंच सांगायचे की मी 1973 सालापासून शिवसेनेमध्ये सक्रिय आहे. त्यावेळी तर अमित ठाकरे यांचा जन्म देखील झाला नव्हता. कित्येक केसेस आम्ही अंगावर घेतल्या आहेत. कित्येक लाट्या-काट्या खाल्ल्या आणि तो सगळा काळ डोळ्यासमोरून घालवला. त्यामुळे अमित ठाकरे निवडणुकीसाठी यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असंही सरवणकर म्हणालेत.

अमित ठाकरे यांनी कोणत्या समुद्रकिनारी पाहिले मला माहित नाही. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई स्वच्छ करण्यासाठी जो निधी दिला. त्यांनी आम्ही याआधीच माहीम दादरचे सगळे समुद्र किनारे स्वच्छ केलेत. आता समुद्रातला जो गाळ आहे तो पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर आला असेल आणि मग ते साफ करत असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवं, असा टोलाही सदा सरवणकर यांनी लगावला आहे.