Shivsena-BJP : तिसरा कोणी नसताना फडणवीस-शिंदेंमध्ये BMC महापौरपदाचा फॉर्म्युला ठरला, अमेय घोलेंच्या दाव्याला आशिष शेलारांचं उत्तर
Shivsena-BJP : "जे नाकारत आहेत, त्यांना काही माहीत नाही. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यात चर्चा झाली आहे. इतर कोणी नाही. जो व्यक्ती मुळात उपस्थित नव्हता, पण नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना निर्णय फॉलो करावा लागेल. माझे एवढेच म्हणणे आहे की आधी वरिष्ठांशी बोलून घ्या आणि मग माध्यमांवर बोला. शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्ही फॉलो करु" असं अमेय घोले म्हणाले.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेतील महापौर पदावरुन भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील अंतर्गत मतभेद, संघर्ष वाढला आहे. दोन्ही पक्षांमध्ये महापौरपदावरुन मतभेद आहेत. पावर शेअरिंगवरुन असलेला हा वाद आता समोर आला आहे. “मुंबई महापौर पदावर शिवसेनेचा दावा कायम आहे. ज्यांना काही माहित नाही त्यांनी बोलु नये” असं शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी नवनाथ बन यांना टोला लगावला. “सहामहिन्यांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांमध्ये महापौर पदाचा फॉर्म्युला ठरला. वर्षा बंगल्यावर मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार हे ठरले, तिथे तिसरा कोणीही व्यक्ती नव्हता” असा दावा अमेय घोले यांनी केला.
“पहिल्या अडिच वर्षाच्या टर्मनंतर सव्वा-सव्वा वर्ष महापौर पदाचं वाटप होणार. शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर झालेल्या या निर्णयाची आम्हाला स्पष्ट कल्पना दिली होती. कदाचित भाजप नेत्यांना यासंबंधी काही कल्पना नसेल” असं अमेय घोले यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये अंतर्गत संवादाचा अभाव
सर्व समित्यांचं वाटप ठरलेल्या योजनेनुसारच झालं असून ते लागू करण्यात आल्याचं घोले यांनी सांगितलं. “भाजपमध्ये भले अंतर्गत संवादाचा अभाव असेल पण शिवसेना ठरलेल्यावेळी महापौरपदासाठी पूर्ण आत्मविश्वासाने दावा सादर करेल” असं घोले म्हणाले.
आशिष शेलार दावा फेटाळताना काय म्हणाले?
दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या या दाव्याचा पक्षाशी कसा संबंध नाही ते समजावून सांगितलं. “अनौपचारिक चर्चेला काहीही कायदेशीर अधिकार नसतो. वरिष्ठ नेत्यांमध्ये असं काही ठरलं असतं तर त्याची औपचारिक घोषणा सार्वजनिकरित्या नक्कीच झाली असती” असं सांगितलं.
भाजपं मोठा भाऊ
मुंबई महानगरपालिकेत भाजपं मोठा भाऊ आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना छोट्या भावाच्या भूमिकेत आहे. भाजपचे 110 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, तर शिंदे शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांची महापालिकेत युती आहे. आता शिंदे शिवसेनेकडून सव्वावर्षासाठी महापौरपद मिळणार असा दावा केला जात आहे.