एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, थेट भाकरीच फिरवणार? तातडीच्या सूचना जारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकांमध्ये ‘भाकरी फिरवून’ पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या बैठका घेतल्या आहेत. कामाचा आढावा घेऊन पक्ष धोरणे प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळात अनेक महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. काही पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून तर काही पक्ष मेळावे आणि संमेलनं घेऊन पक्ष मजबूत करण्याचं काम करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनाही कामाला लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट महापालिकांमध्ये भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगरसेवकांना तातडीने सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे महानगर पालिकेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नगरसेवकांच्या समस्याही एकनाथ शिंदे ऐकून घेणार आहेत. पक्षाची धोरणं सक्षमपणे राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरसेवकांना देण्यात आल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पुढच्या आठवड्यात घडामोडी?
या बैठकीत उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कामाचं ऑडिटही केलं जाणार आहे. मनपातील टेंडर प्रक्रिया आणि लोकाभिमुख कामांमध्ये शिवसेनेच्या मनपातील मुख्य नेत्यांच्या भूमिकेवर पक्ष नेतृत्वाचं बारीक लक्ष आहे. पुढच्या आठवड्यात या बाबत महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
नगराध्यक्षांची बैठक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या राज्यातील सर्व नगराध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व नगराध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज दुपारी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये ही बैठक होणार असून एकनाथ शिंदे यावेली मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नगराध्यक्षांना येणाऱ्या अडचणी, प्रभागातील विकास कामे, महायुतीतील वाद, आपआपसातील वाद आणि पक्षवाढीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे नगराध्यक्षांच्या समस्या ऐकून घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.