सर्वांना सोबत घेऊन ५ जुलै रोजी विजयी जल्लोष करणार…, संजय राऊत यांची माहिती

मनसे आणि शिवसेना उबाठाने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाची तयारी सुरु केली होती. त्याचे सर्व नियोजन झाले होते. आता त्या मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यासाठी सर्वांना बोलवण्यात येणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सर्वांना सोबत घेऊन ५ जुलै रोजी विजयी जल्लोष करणार..., संजय राऊत यांची माहिती
संजय राऊत
| Updated on: Jun 30, 2025 | 10:36 AM

राज्यात हिंदी सक्तीचा अध्यादेश राज्य सरकारने मागे घेतला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी व्यक्तींची ताकद दिसली. दोन्ही भावांचे एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी महत्वाचे होते. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात मराठी ताकदीचा भूकंप होणार होता. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घेतला, असा दावा शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच ५ जुलै रोजी मोर्चाऐवजी विजयी सभा होणार आहे. त्यात सर्वांना सोबत घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

विजय मेळावा घेणार

संजय राऊत म्हणाले, मनसे आणि शिवसेना उबाठाने ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाची तयारी सुरु केली होती. त्याचे सर्व नियोजन झाले होते. मराठी ताकदीला घाबरुन सरकारने निर्णय मागे घेतला. या मोर्चासाठी जी तयारी झाली होती, त्याचा उपयोग आता विजय मेळावा करण्याबाबत चर्चा सुरु आहे. राज ठाकरे आज त्याबाबत निर्णय घेणार आहेत. जे मोर्चासाठी एकत्र आले, त्या सर्वांना या विजय मेळाव्याचे आमंत्रण देणार आहोत. कुणाला दूर ठेऊन विजय जल्लोष होणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणे हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मिळालेल्या विजयाची पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढे असे अनेक विजय मिळवायचे आहे. मुंबई मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्र येण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सत्ता मिळवणे, हा आमचा हेतू आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत…

हिंदी सक्तीचा निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री काळात घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजप खोट्या अफवा पसरवणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत. जसे नरेंद्र मोदी, अमित शाह खोटे बोलतात, तसे फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय धोरणाप्रमाणे खोटे बोलत आहेत. तुम्ही माशेलकर अहवाल मांडत का नाही? असा सवाल राऊत यांनी विचारला.