
Sanjay Raut on BJP : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग हा भाजपची अतिरिक्त शाखा असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला. गेल्या दोन दिवसात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेले. मतदार याद्यातील घोळावर त्यांनी आयोगाला धारेवर धरले. त्यानंतर आज राऊतांनी आयोगासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.
मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली. निवडणूक याद्याच बोगस असतील तर त्या याद्यांना महत्त्व काय. ते मतच जर चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्याला अर्थ काय. आम्ही जे आरोप करतोय त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही. अशावेळी जर भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा. त्या निर्दोष करा, तर त्यात काय चुकीचं आहे, असा सवाल राऊतांनी केला.
निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंडेड शाखा
निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे. जशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वा अन्य संघटना आहे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. आमच्या राजवटीत असे नव्हते. निवडणूक आयोगातील माणसं जर भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर आम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार असा सवाल राऊतांनी केला. पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं आणि याद्यातील घोळावर, त्यात गु्न्हेगारीसारखं काम सुरु असल्याचं दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका
आम्ही या शिष्टमंडळात येण्यासाठी भाजपलाही आमंत्रण दिलं होतं. पण ते आले नाहीत. निवडणूक आयोग हा चोर आहे आणि भाजपहा चोरांचा सरदार आहे. त्यामुळे चोर चोर कसं भेटणार? असा टोला राऊतांनी लगावला. महाविकास आघाडी ही आता महा कन्फ्युज आघाडी झाल्याची टीका काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार राऊतांनी घेतला.
देवेंद्र फडणवीस यांच्या पंजोबा नाना फडणवीस हे सुद्धा असेच बोलायचे. तुम्ही पेशावाईतील काही कागदपत्रं चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राऊतांनी केला. पेशवाईतील जे साडेतीन शहाणे होते. त्यात फडणवीस हे अर्धे शहाणे होते. त्यामुळे पेशवाई बुडाली. फडणवीस हे तर त्यापेक्षाही कमी शहाणे दिसत आहेत. वकील आहात ना फडणवीस? ते वकील आहेत आणि भाजपचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं. आम्ही जे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले, ते त्यांच्या काळजात घुसले आहेत. तुम्ही चोऱ्या करता, घोटाळे करता आणि बोगस मतदानावर निवडणूक जिंकता, यात कन्फ्युजन काय आहे मिस्टर फडणवीस? मला सांगा जरा, असा सावल राऊत यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही. यांना कुणी वकील केलं आणि यांनी कुठं वकिली केली हे कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदी यांच्या मेहरबानीने जे मुख्यमंत्री देशभरात झाले, त्यापैकी फडणवीस एक आहे, ते कर्तृत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत असा टीका राऊतांनी केली.