‘घाटाचा राजा’ पुन्हा अवतरणार, पुरुषच नव्हे महिलाही गाजवणार रेस; हिंदायानकडून मुंबई-पुणे सायकलिंग

हिंदायान फाउंडेशनने ऐतिहासिक ‘घाटाचा राजा’ सायकलिंग किताब पुन्हा सुरू केला आहे. नवी मुंबई ते पुणे अशी ही सायकल राईड आयोजित केली असून, ती पारंपारिक मार्गाने जाईल. या उपक्रमात आता महिलांनाही प्रथमच सहभागी होता येणार आहे, जे पूर्वी शक्य नव्हते.

‘घाटाचा राजा’ पुन्हा अवतरणार, पुरुषच नव्हे महिलाही गाजवणार रेस; हिंदायानकडून मुंबई-पुणे सायकलिंग
Mumbai Pune Cycling Race
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 12:00 AM

अनेक वर्षांपासून बंद असलेला ऐतिहासिक ‘घाटाचा राजा’ हा सायकलिंगचा मानाचा किताब नव्या स्वरूपात पुन्हा सुरू होणार आहे. हिंदायान फाउंडेशनतर्फे रविवार, 20 डिसेंबर रोजी नवी मुंबई ते पुणे सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक मुंबई-पुणे सायकल शर्यतीची सुरुवात मुंबईतील काळा घोडा परिसरातून होत असे. जुना मुंबई-पुणे महामार्ग मार्गे ही शर्यत पुण्यातील शिवाजीनगर येथे संपत असे. हिंदायानची ही सायकल राईड नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन याच ऐतिहासिक मार्गाने पुण्यातील पोलीस मैदान, शिवाजीनगर येथे समाप्त होईल.

ब्रिटिश राजवटीच्या काळात 1945 मध्ये सिडनी चॉर्डर या अँग्लो-इंडियन व्यक्तीने सुरू केलेल्या ‘बॉम्बे टू पूना सायकल रेस’ला भारतीय सायकलिंगच्या इतिहासात विशेष स्थान होते. या शर्यतीतील प्रतिष्ठेचा ‘घाटाचा राजा’ हा किताब भारतीय सायकलिंगमधील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जात असे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अखेर ही शर्यत बंद पडली. हिंदायानने 2023 आणि 2024 मध्ये मुंबई-पुणे सायक्लोथॉनचे पुनरुज्जीवन केले. मात्र, मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बांधकामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि इतर अडचणी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार 2025 आणि 2026 मध्ये या उपक्रमाला स्थगिती देण्यात आली.

Loading...

स्वरूप बदलले

हिंदायानचे संस्थापक आणि पाच खंडांतील 35 देशांमधून जमिनीमार्गे जगप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय विष्णुदास चापके यांनी सांगितले की, वाहतूक आणि व्यवस्थापनासंबंधीच्या अडचणी लक्षात घेऊन या उपक्रमाचे स्वरूप बदलण्यात आले आहे. “पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमधील भोर घाट, ज्याला खंडाळा घाट म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्वतीय मार्ग आहे. अनेक पिढ्यांपासून या घाटाने सायकलस्वारांची ताकद, कौशल्य आणि सहनशक्तीची परीक्षा घेतली आहे. वाहतुकीची मोठी वर्दळ आणि मर्यादित साधनसामग्री लक्षात घेऊन आम्ही या उपक्रमाचे स्वरूप बदलले आहे,” असे चापके यांनी सांगितले.

महिलाही होणार सहभागी

या स्पर्धेत केवळ घाटातील टप्पा स्पर्धात्मक असेल, तर उर्वरित अंतर सामूहिक सायकल राईड म्हणून पूर्ण केले जाईल. घाटाचा निर्धारित टप्पा सर्वप्रथम पूर्ण करणाऱ्या सायकलस्वारांना मानाचा ‘घाटाचा राजा’ हा किताब बहाल केला जाईल. नव्या स्वरूपामुळे महिलांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक बॉम्बे-पुणे सायकल शर्यतीत महिलांना सहभागी होण्याची परवानगी नव्हती. मात्र, चर्चा आणि विचारविनिमयानंतर हिंदायानने सर्व लिंगांच्या सायकलस्वारांसाठी सहभागाचे दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर रँडोन्युअर मालिका पूर्ण केलेले किंवा पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (PBP), लंडन-एडिनबरा-लंडन (LEL), आयर्नमॅन ट्रायथलॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले अथवा खंडाळा घाट यशस्वीपणे पार केलेले सायकलस्वार या उपक्रमासाठी पात्र असतील.

भारतीय सायकलस्वारांसाठी सुरक्षित आणि स्वदेशी व्यासपीठ निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे चापके यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहनशक्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भारतीय सायकलस्वारांना फ्रान्स आणि इंग्लंडला जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून हिंदायानच्या सायकल उपक्रमांना आवश्यक रसद आणि पोलीस मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने हिंदायानला विमानांच्या लँडिंगसाठीही सक्षम असलेल्या नियंत्रित प्रवेशाच्या यमुना एक्स्प्रेसवेवर सायकल राईड आयोजित करण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे. गुजरात सरकारनेही हिंदायानच्या अहमदाबाद-वडोदरा शतक सायकल राईडला सहकार्य केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us