मुंबईकरांना मोठा दिलासा, 10 टक्के पाणी कपात रद्द करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय, समाधानकारक पाऊस पावला

| Updated on: Jul 08, 2022 | 3:31 PM

तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा, 10 टक्के पाणी कपात रद्द करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय, समाधानकारक पाऊस पावला
relief from water cut
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई- जून महिन्यात चांगला पाऊस न झाल्याने मुंबईसह (Mumbai)राज्यातील मोठ्या शहरांवर पाणीकपातीचे (Water cut) संकट उभे राहिले होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा होता. हे लक्षात घेऊन चांगला पाऊस होईपर्यंत मुंबईई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता रद्द (cancel)करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या राठवड्यापासून मुंबई, तसेच मुंबईला पाणी पुरवठा होणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला. पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आजपासून (दिनांक ८ जुलै २०२२)पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत आता २६ टक्के पाणीसाठा

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत दिनांक २७ जून २०२२ रोजी १ लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या ३ ते ४ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड यासह राज्यातील इतर काही भागातही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सातत्याने हा पाऊस सुरु राहिल्यास तलाव आणि धरणांतील पाणीसाठी आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास येत्या १० ते १५ दिवसांत धरणे पूर्णपणे भरल्यास मुंबई, ठाणे या दोन मोठ्या शहरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटेल. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे ही प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात आहेत, या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तर पुढचे वर्ष पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार नाही.