मालेगाव अत्याचार प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवा; शरद पवार गटाची मागणी

मालेगावात एका तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडीतांच्या कुटुंबाची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी भेट घेतली आहे.

मालेगाव अत्याचार प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवा; शरद पवार गटाची मागणी
| Updated on: Nov 27, 2025 | 9:45 PM

मालेगावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली आहे. हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमास फासावर लटकवावे तसेच या प्रकरणी संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात चर्चा करून महिला अत्याचाराबाबत कठोर कायदा पारीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी केली. दरम्यान, मर्जिया पठाण यांनी पोलीस उपअधीक्षक तेगबीर सिंह संधू (ips) यांची भेट घेऊन नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असे आरोपपत्र तयार करावे अशी मागणी केली आहे.

मालेगावपासून नजीक असलेल्या एका गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची अत्यंत निघृण पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, पक्षाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मर्जिया पठाण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि पोलीस उपअधीक्षक (asp) तेगबीर सिंह संधू (ips) यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली.

 न्यायदानात उशीर होत आहे

राज्यात महिला – मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिथे असे अत्याचार होतात. तिथे पोहचून न्याय देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो. आजमितीला देशात दर पंधरा मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होत आहे. आपल्या देशात कडक कायदे असूनही केवळ न्यायदानात उशीर होत असल्याने अनेक घटनांमध्ये आरोपी मुक्त सुटत आहेत. न्यायदानातील विलंबामुळे न्याय नाकारला जात असल्याची भावना पीडितांमध्ये तयार होत आहे. त्यामुळेच मालेगाव घटनेतील आरोपपत्र तयार करताना कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अशी विनंती आपण पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. या नराधमाला असे कडक शासन झाले पाहिजे की यापुढे कुणाचीही असा गुन्हा करण्याची हिमंत होणार नाही, अशा घटना आपण सहन करणार नाही. जर आरोपींना शिक्षा करण्यास यंत्रणा सक्षम नसेल तर आम्ही नराधमाला योग्य तो धडा शिकवू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला