Suentra Pawar : राष्ट्रवादी विलीनीकरणाचा पोपट मेला? सर्वात मोठी अपडेट काय? सुनेत्रा पवार कधी पत्ते उघडणार?

NCP Merger Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय मागे पडत चाललाय का? असा प्रश्न पडावा इतकी स्मशान शांतता आहे. कारण काही बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर या विषयावर प्रमुख नेत्यांचे मौन सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारं आहे.

Suentra Pawar : राष्ट्रवादी विलीनीकरणाचा पोपट मेला? सर्वात मोठी अपडेट काय? सुनेत्रा पवार कधी पत्ते उघडणार?
सुनेत्रा पवार, अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी विलीनीकरण
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 11:15 AM

NCP Merger Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा पोपट मेलाय का? असा प्रश्न राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही पडला आहे. कारण काही बोटावर मोजण्याइतके नेते सोडले तर या विषयावर बडे नेते भाष्य करण्याचे टाळत असल्याचे अथवा चेंडू टोलवण्याची कसरत करताना दिसत आहेत. सद्या अजितदादांच्या विमान अपघातावरून संशयाचे धुके गडद झाले आहे. त्यात 27 जानेवारी 2026 रोजीच्या घडामोडींकडे अंगुली निर्देश करत आमदार रोहित पवार काहीतरी इंगित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांनी अजूनही कुणाचे थेट नाव घेतलेले नाही. या ताज्या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीत नाराजी नाट्य तर सुरू नाही ना याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्याचे सध्या तरी समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत टोलवाटोलवी

अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी हालचाली केल्या, असा दावा करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. त्यानंतर या 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला. तर दुसरीकडे अजितदादा गटातील बड्या नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले. दादांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती दिली नाही, असा त्यांचा दावा आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

विलीनीकरणाविषयी कुणाची नाराजी?

राष्ट्रवादी पक्षात विलीनीकरणाविषयी कुणाची नाराजी आहे याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते याविषयी नाखूष असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून तरी समोर येत आहे. विलीनीकरणाचा चेंडू या कोर्टातून त्या कोर्टात टोलावल्या जात आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सोमवारी बोलणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. अजितदादांच्या गटातील काही नेत्यांना विलीनीकरणानंतर सत्तेत वाटा द्यावा लागणार असल्याने ते एकत्रि‍करणाच्या विरोधात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार मौन कधी सोडणार?

तर या सर्व घटनाक्रमात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार या अद्यापही मौन बाळगून आहेत. त्यांनी विलीनीकरण आणि इतर मुद्यांवर अद्याप मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य अद्याप केलेले नाही. तर अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी सुद्धा या विषयावर पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अपडेट सध्या तरी समोर आलेली नाही. सुनेत्रा पवार याविषयीवर मत मांडतील त्यावेळी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल.