‘मराठा समाजात फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवले…’, सुरेश धस यांना जितेंद्र आव्हाड यांचा टोला

Suresh Dhas and Jitendra Awhad : तुम्ही काढा मोर्चे. आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला मनोज जरांगे यांना कापण्यासाठी पाठवले आहे. जरांगे यांना डाऊन करण्यासाठी हे प्यादे बाहेर काढले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी पाठवले आहे. लोकांना हे समजत नाही का? लोक काय मूर्ख आहेत का?

मराठा समाजात फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवले..., सुरेश धस यांना जितेंद्र आव्हाड यांचा टोला
सुरेश धस, जितेंद्र आव्हाड
| Updated on: Feb 11, 2025 | 2:07 PM

Suresh Dhas and Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. संतोष देशमुख प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू, अक्षय शिंदे एन्काऊंटरवरुन त्यांच्यात जुंपली आहे. आता मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुरेश धस यांना पुन्हा घेरले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी, मनोज जरांगे यांना डाऊन करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना तुम्ही मोर्चेकाढून दाखवा असे आव्हान दिले होते, त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही काढा मोर्चे. आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला मनोज जरांगे यांना कापण्यासाठी पाठवले आहे. जरांगे यांना डाऊन करण्यासाठी हे प्यादे बाहेर काढले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी पाठवले आहे. लोकांना हे समजत नाही का? लोक काय मूर्ख आहेत का? तुम्हाला मोर्चाबद्दल इतके प्रेम आहे का? आतापर्यंत हजारो मोर्चा निघाले आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तुम्ही फक्त घाबरवण्याचे काम केले. ओबीसींना घाबरवले. मराठ्यांना घाबरवले. तुम्ही तुमच्या घरात सुखी राहा, मी माझ्या घरात सुखी आहे. तुमच्या एकाही प्रश्न मला उत्तर द्यायचे नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

शाळेतील सीसीटीव्ही गेले कुठे?

सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड अक्षय शिंदेची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय शिंदे याचे मी गुणगाण गायले नाही. त्याचा खून झाला, हे आम्ही म्हणत नाही तर न्यायाधीश म्हणतात. त्याचे एन्काऊंटर झालेले नाही. न्यायालयाने सांगितल्यावरही अक्षय शिंदे प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास सरकार तयार नाही. अक्षय शिंदे गुन्हेगार आहे. त्याला फाशी झाली पाहिजे. त्याचा खून करण्याचे तुम्हाला कोणी सांगितले. तुम्ही न्यायपालिका झाले आहे का? शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कुठे गेले? का तो गुन्हा पहिल्याच मिनिटाला दाखल झाले नाही?

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मोर्चातील दगडफेकी संबंध नव्हता. त्याच्या हातात दगड नव्हता. त्याच्याकडे कॅमेरा होता. परभणीत कोबिंग ऑपरेशनमध्ये घरात घुसून-घुसून मारले. बायकांनाही मारले. त्यानंतर इतक्या उशिराने तुम्हाला जाग आली? आम्ही आमचे काम करत आहोत, तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही फडणवीस साहेबांचे प्रवक्ते म्हणून काम करत आहे, असे आव्हाड यांनी आमदार धस यांना म्हटले.