मुलगी बेपत्ता, बापाची आत्महत्या, चेंबुरमध्ये रास्तारोको करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुलगी बेपत्ता, बापाची आत्महत्या, चेंबुरमध्ये रास्तारोको करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुलीचं अपहरण (Kidnapping of Girl in Kurla) होऊन 6 महिने झाले आणि पोलिसांकडून तिच्या शोधासाठी सहकार्य मिळत नसल्याने एका मुलीच्या वडिलांनी अखेर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली.

सचिन पाटील

| Edited By:

Oct 22, 2019 | 9:01 PM

मुंबई: मुलीचं अपहरण (Kidnapping of Girl in Kurla) होऊन 6 महिने झाले आणि पोलिसांकडून तिच्या शोधासाठी सहकार्य मिळत नसल्याने एका मुलीच्या वडिलांनी अखेर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली. पंचाराम रिठाजिया असं या वडिलांचं नाव आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त आहे. रिठाजियांच्या अंत्यविधीच्या वेळी नागरिकांनी संतापून पोलीस प्रशासनाविरोधात रास्तारोको (Rastaroko of People in Chembur) केला. यावेळी नागरिकांकडून पोलिसांविरोधत घोषणा देण्यात आल्या. तसेच मुलीचा शोध घेत न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज (Lathicharge of Police) केला आहे.

पंचाराम रिठाजिया यांनी मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळलं आहे. रिठाजिया यांची 17 वर्षीय मुलगी आरती रिठाजिया कुर्ल्यातून मागील 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. रिठाजिया यांनी याप्रकरणी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची लेखी तक्रारही दिली. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखवण्यात आले नाही. यालाच कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.

रिठाजिया यांच्या आत्महत्येनंतर आज (22 ऑक्टोबर) स्थानिक रहिवासी त्यांच्या अंत्यविधीसाठी जात होते. त्यावेळी हजारो लोकांनी पोलीस प्रशासनाच्या कामावर नाराज होत घोषणाबाजी केली. यावेळी नेहरूनगर परिसरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.

विशेष म्हणजे अपहरण करणाऱ्या आरोपींनी पीडित कुटुंबाला तक्रार दाखल करु नये यासाठी धमकावले आहे. तक्रार दाखल केली तर कुटुंबातील इतर 2 मुलांचंही अपहरण करण्याची धमकी आरोपींनी दिली. यालाच कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर संतापलेल्या नागरिकांकडून रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी या रास्तारोकोवर लाठीचार्ज केला. यावेळी नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

“आमची मुलगी बेपत्ता झाली, मात्र त्यानंतर काहीच कारवाई करण्यात आली नाही. आम्ही स्थानिक पोलिसांपासून वरिष्ठांपर्यंत न्यायासाठी गेलो. मात्र, आम्हाला न्याय मिळाला नाही. मुलीचा तपास लागावा म्हणून प्रयत्न करुनही मुलगी न मिळाल्याने आणि आरोपींनी धमकावल्याने माझ्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही आरोपींवर कारवाई व्हावी म्हणून त्यांचा मृतदेह 10 दिवस तसाच ठेवला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, 10 दिवस होऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर आज त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.”

-मुलीची आई

अंत्यसंस्काराच्या वेळी आम्ही कुणीही पोलिसांवर हल्ला केलेला नाही. हे सर्व आरोपींनीच घडवून आणल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पीडिताच्या कुटुंबीयांमध्ये एक मुलगा आणि 2 मुली आहेत. मुलगा 11 वीच्या वर्गात शिकतो.

पीडित कुटुंबीयांनी मुलीचा तपास लागावा आणि ज्यांच्यामुळे मुलीच्या वडिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें