
लाखो मुंबईकरांचे श्रद्घास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनला यंदा खूप उशीर झाला आहे. लालबागचा राजाची मिरवणूक शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी १० वाजता सुरू झाली. यानंतर संपूर्ण रात्रभर लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. यानंतर सकाळी ८ च्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता. मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती न चढल्याने विसर्जनास अडथळे निर्माण झाले आहेत. आता याप्रकरणी लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.
नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा हा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असला तरी आता मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असतानाही दुसरीकडे लालबागचा राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.
यंदा लालबाग राजासाठी खास तराफा करण्यात आला आहे. पण समुद्राला भरती आल्यामुळे तो खूप हलू लागला. यामुळे गणपतीची मूर्ती त्या तराफ्यावर ठेवता आली नाही. यानंतर मूर्तीला तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न पुन्हा केला गेला. यावेळी मूर्तीवरील दागिने काढून टाकण्यात आले, पण ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती, ती ट्रॉली पाण्यात अडकली. यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवता आले नाही.
मंडळाचा विसर्जनाचा एक मोठा निर्णय
आता ही अडचण पाहता लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. समुद्रातील भरती ओसरल्यावर म्हणजेच ओहोटी आल्यावरच विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तोपर्यंत हा बाप्पा समुद्राच्या पाण्यात ठेवला जाणार आहे. यानंतर ओहोटी येताच बाप्पााला तराफ्यावर विराजमान केले जाईल. त्यानंतर खोल पाण्यात नेऊन त्याची आरती केली जाईल. यानंतर दरवर्षीप्रमाणे या बाप्पाचेही विसर्जन होईल.
दरम्यान लालबागचा राजा विसर्जन होण्यास वेळ लागत असल्याने इतर गणपती मंडळांच्या मूर्तींना विसर्जनासाठी आधी पाठवण्यात आले आहे. लालबागचा राजाला समुद्राच्या भरतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ गिरगाव चौपाटीवर थांबावे लागणार आहे. या सर्व तांत्रिक अडचणींमुळे लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब झाला आहे. समुद्रातील पाणी कमी झाल्यावरच विसर्जन पूर्ण होईल, असेही सांगितले जात आहे.