
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्याविषयी खुलासा पण केला आहे. काय आहे हा वाद, काय आहे ते वक्तव्य?
काय आहे ते वक्तव्य?
“काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ” असं वक्तव्य संबंधित व्हायरल व्हिडिओत लक्ष्मण हाके करत असल्याचे दिसते. या व्हिडिओची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. या व्हिडिओत पुढे ते काही तरी बोलत असले तरी ते वक्तव्य नीट ऐकू येत नाही. ते वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयीचे असल्याचे म्हटले जाते. या वक्तव्यावरून एकच खळबळ उडाली आहे. हाके यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.
हाके यांनी केला खुलासा
तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यावर खुलासा केला आहे. माळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडिओ माझा आहे. पण त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा हाकेंनी केला. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप हाकेंनी केला. असं वक्तव्य करायला मी काही वेडा नाही असे ते म्हणाले. हाकेंनी जरांगे यांच्याविरोधात मोर्चा उघडला असताना हा व्हिडिओ समोर आल्याने ते अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
नवनाथ वाघमारे यांची नाराजी
या व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सोशल मीडियावर आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिला आहे. माळी समाजाने नवनाथ वाघमारे यांच्या आधाी लक्ष्मण हाके यांचा सत्कार केला. त्यांचा सन्मान केला. त्याच हाकेंच्या तोंडून असं वक्तव्य निघत असेल तर खरंच दुर्देव आहे. आता ते बोलले किंवा नाही बोलले हे माहिती नाही. ते व्हिडिओत तरी बोललेले दिसत आहेत. त्यावर आता हाके प्रतिक्रिया देतील, असे वाघमारे म्हणाले.