रिकामटेकडे आहेत, आनंद घेऊ द्या… दिल्लीत जाण्यावरून मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत मंत्रिपद स्वीकारण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. टीकाकारांना 'रिकामटेकडे' संबोधत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करत राहण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदींनी आपल्याला महाराष्ट्राची जबाबदारी दिली असून, दिल्लीला जाण्याच्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊतांच्या दाव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

रिकामटेकडे आहेत, आनंद घेऊ द्या... दिल्लीत जाण्यावरून मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 6:36 PM

काही लोक रिकामटेकडे आहेत. त्यांना काही कामधंदा नाही. त्यांना आनंद घेऊ द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यावर बोललं जात आहे. फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदही दिलं जाणार आहे. फडणवीस कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या काही हातात नाही. शेवटी दिल्लीच्या हातात आहे, असंही विरोधक म्हणत आहेत. त्यावर अखेर फडणवीस यांनी मौन सोडत विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. मला वाटतं अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याविषयीच्या चर्चा करायला आवडतात. त्यामुळे त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या, असं सांगतानाच मी मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील जनतेने माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे. मी ही जबाबदारी पार पाडत राहीन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींनी जबाबदारी दिली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे फडणवीस दिल्लीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांना चांगलंच फटकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी इतर विषयांवरही चर्चा झाली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

काही लोक तारे तोडत आहेत…

माझ्याबाबत काही लोक तारे तोडत आहेत. ज्यांना फुगे उडवायचे, पतंग उडवायची त्यांना पतंग उडवू द्या. मी महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राची जनता आणि मोदींनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील जनतेची सेवा करत राहणार आहे, असं ते म्हणाले. तुम्हाला दिल्लीत कोण पाठवू इच्छितंय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी स्मित हास्य केलं. अनेकांना वाटतं मी दिल्लीत गेलं पाहिजे. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी मुंबईतच राहीन, असंही त्यांनी सांगितलं.

दोन महिन्यात… राऊतांचा दावा

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी येत्या एक दोन महिन्यात केंद्र सरकारचा विस्तार होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे बदल होणार असल्याचं म्हटलं होतं. केंद्र सरकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्लीतील महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतो, असंही राऊत म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us