सरकारला दिवसाच नव्हे, रात्रीही… शिवसेनेचे इशारा; आक्रमक आंदोलन छेडणार?
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही सरकारने अजूनही दुष्काळ जाहीर केलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंबादास दानवे यांनी सरकारला दिवसा-रात्री जाब विचारण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली आहेत. येत्या काळात तर जनावराचा चारा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार आहे. सरकारने अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीचा हात दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला दिवसाच नव्हे, तर रात्रीही सळो की पळो करून सोडावं लागेल, असा इशारा दिला आहे.
उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. तसेच सरकारच्या नाकर्तेपणावर संतापही व्यक्त केला. मराठवाडा विदर्भात दुष्काळाची परिस्थिती आहे. कोण पाहतंय तिकडे? एकीकडे कर्नाटक राज्य 130 तालुक्यात दुष्काळ जाहीर करतंय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुहूर्त पाहत बसले आहेत. या विषयावर सरकारला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीही उठता बसता सरकारवर तोफ डागावीच लागेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
पळ काढू देणार नाही
माझ्या माहिती प्रमाणे 52-53 झाले पाऊस नाही. पूर्वी 21 दिवसानंतर विमा मिळत होता. आता 52 दिवसापासून पाऊस नाही. एवढे दिवस पाऊस नाही मग कोणतं पीक जिवंत राहणार आहे? पीक संपलेलं आहे. कोरडवाहू पीक संपलं आहे. बागायती होतं. त्याला वीज मिळाली नाही, तेही संपलं आहे. 5 ऑक्टोबरची वाट का बघता? कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला ना? तुम्ही का वाट बघत आहात? सरकार प्रश्नातून पळ काढत आहे. पण आम्ही पळ काढू देणार नाही, असं दानवे म्हणाले.
अजून दौरे काढणार
आम्ही मराठवाड्याचा दौरा केला आहे. पीक पाण्याची परिस्थिती पाहिली आहे. उद्धव ठाकरे येऊन गेले. संजय राऊत, आदित्य ठाकरेंनी दौरा केला. आम्ही दौरा करत आहोत. आम्ही या दौऱ्यांची तीव्रता अधिक वाढवू, असंही त्यांनी सांगितलं.
नांदेडमध्ये घंटानाद
दरम्यान, कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी आज घंटानात आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं. काँग्रेस नेते, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ते कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. कोरडा दुष्काळ जाहीर करावा, 100 टक्के पीकविमा द्यावा, विशेष पॅकेज द्यावे, ऊसाला प्रतिटन सहा हजार भाव जाहीर करावा, रब्बीच्या पेरणीसाठी 25 हजार रूपये द्यावे, या मागण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
बावनकुळे अमरावतीत
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी जनता दरबार घेतला. तसेच यावेळी जिल्ह्यातील नागरी समस्या ऐकून घेतल्या. त्यांच्या जनता दरबाराला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
