
महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीतील कथित गोंधळावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेते आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेणार आहेत. या भेटीवेळी महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित असणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगाची ही दुसरी संयुक्त भेट असणार आहे.
काल मंगळवारी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी या सर्व नेत्यांनी मतदार यादीतील विसंगतींवर अनेक प्रश्न विचारले होते. मात्र आयोगाने या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी वेळ हवा असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही चर्चा अपूर्ण राहिली. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी ११ वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे संयुक्तपणे सर्वपक्षीय नेत्यांशी बैठक घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करणार आहेत. यामुळे आता कालच्या आक्षेपांवर आज निवडणूक आयोग काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
आज निवडणूक आयोगासोबत चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि राज ठाकरे प्रथमच संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. शिवालय या ठिकाणी ही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र दिसणार आहेत. एकाच मुद्द्यावर एकत्र आलेल्या या नेत्यांची आजच्या बैठकीनंतरची पुढची भूमिका काय असेल, याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच राज ठाकरे या संयुक्त व्यासपीठावरून काय संदेश देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान मंगळवारच्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र आजच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. ते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे आज शरद पवारांशिवाय सर्व नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मतदार याद्यांच्या वादातून सुरू झालेल्या राजकीय संघर्षावर या बैठकीत काहीतरी ठोस तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.