Virar Hospital Fire | एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक, 13 रुग्ण होरपळले, विरार रुग्णालयात आग कशी भडकली?

| Updated on: Apr 23, 2021 | 12:17 PM

विजय वल्लभ कोव्हिड रुग्णालयात AC च्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (Virar Vijay Vallabh COVID Hospital Fire)

Virar Hospital Fire | एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक, 13 रुग्ण होरपळले, विरार रुग्णालयात आग कशी भडकली?
विजय वल्लभ रुग्णालय
Follow us on

Virar Hospital Fire विरार : रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी रुग्णांचा जीवावर बेतल्याची आणखी एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून 13 जणांना प्राण गमवावे लागले, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीनंतर 22 जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील दुर्घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Virar Vijay Vallabh COVID care Hospital Fire)

आयसीयू वॉर्डात भीषण आग

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

वल्लभ कोव्हिड रुग्णालयात AC च्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, अशीही माहिती समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार-नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया

विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालयातील सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट झाला, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली. त्यावेळी आयसीयूत 17 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

रुग्णालयात एकूण 90 रुग्ण उपचार घेत होते. फायर ऑडिट वगैरे पुढचा प्रश्न आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात 13 जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

मृत रुग्णांची नावे लिंग वय
उमा सुरेश कनगुटकर स्त्री 63
निलेश भोईर पुरुष 35
पुखराज वल्लभदास वैष्णव पुरुष 68
रजनी आर कडू स्त्री 60
नरेंद्र शंकर शिंदे पुरुष 58
कुमार किशोर दोषी पुरुष 45
जनार्धन मोरेश्वर म्हात्रे पुरुष 63
रमेश टी उपायन पुरुष 55
प्रवीण शिवलाल गौडा पुरुष 65
अमेय राजेश राऊत पुरुष 23
शमा अरुण म्हात्रे स्त्री 48
सुवर्णा एस पितळे स्त्री 64
सुप्रिया देशमुख स्त्री 43

(Virar Vijay Vallabh COVID care Hospital Fire)

संबंधित बातम्या : 

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग, 13 जणांचा मृत्यू

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू

(Virar Vijay Vallabh COVID care Hospital Fire)