तीन महिन्यात राज्यात मोठा भूकंप? एकनाथ शिंदे… शिंदेंच्या बड्या मंत्र्यानेच थेट सांगितलं
विधान परिषद निकालानंतर शिंदे सेना आणि भाजपमध्ये मतभेद वाढले आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी येत्या ३-४ महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरू झालं आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडले असून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पण असं असलं तरी शिंदेसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या तीन चार महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं विधान शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना केलं आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नाही. कोणतीही धुसफूस नाही. पण नवनाथ बन यांनी पातळी पाहून टीका करावी. अन्यथा त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का? असा सवाल आम्हीही उपस्थित करू शकतो, असा संताप व्यक्त करतानाच येत्या तीन महिन्यात राज्यात मोठ्या घडामोडी होणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बरीच चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन आहेत, असं संजय शिरसाट यांनी थेटपणे म्हटलं आहे. शिरसाट यांनी उघड उघड संकेत दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिरसाट केवळ एवढंच बोलून थांबले नाहीत, तर पुढील वर्ष हे शिवसेनेचं असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंशी आशिष शेलार बोलले का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल बंद दाराआड चर्चा केली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे बंधू आणि फडणवीस एका मंचावर आले म्हणजे राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येतील असं म्हणणं चुकीचं आहे. नेते एकमेकांना भेटत असतात, असं सांगतानाच आशिष शेलार यांचं राज ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे, असंही शिरसाट म्हणाले.
प्रत्येकाची तिच इच्छा…
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे, असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. माझ्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली तर आजूबाजूसह मराठवाड्यात शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.