मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम पाऊस, घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा, कुठे काय स्थिती?
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली असून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम सरी कोसळल्या आहेत. तर जळगाव आणि गोंदियात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मुंबईकरांना अखेर मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात आज सकाळपासूनच पावसाच्या हलक्या ते रिमझिम सरी कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागांत या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिमझिम; उकाड्यापासून दिलासा
मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिक घामाच्या धारांमुळे कमालीचे हैराण झाले आहेत. शनिवारी सांताक्रूझ येथे 29.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांना रात्रीच्या वेळीही तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. आज रविवार मुंबईत असेच उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज असला, तरी काही भागांत अचानक हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज सकाळीच मुंबईतील दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दादर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे रस्ते ओलसर झाले होते. तर नवी मुंबईतील जुईनगर, वाशी आणि सानपाडा परिसरातही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. तसेच ठाणे शहरातही पावसाने हजेरी लावली. सोमवारी मुंबईत हलक्या सरींची शक्यता कायम असून, मंगळवारी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गोंदियात मान्सूनपूर्व पावसाचा फटका; धान आणि मका भिजून लाखोंचे नुकसान
एकीकडे मुंबईकरांना दिलासा मिळाला असताना तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे.
राज्य महामार्गाच्या लगत शेतकऱ्यांनी वाळवण्यासाठी ठेवलेले धान आणि मका पूर्णपणे भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका शेतकऱ्याने पाच एकरांतील धान चुरून रस्त्यावर वाळत घातले होते, तर दुसऱ्या शेतकऱ्याने मका वाळवण्यासाठी ठेवला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे दोन्ही पिके ओलसर होऊन खराब झाली आहेत. आधीच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजासमोर आता उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे. याप्रकरणी शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगावात पहाटे जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस; वीज पुरवठा खंडित
जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि तब्बल अर्धा तास वेगवान वादळी वारे वाहत होते. या वादळानंतर जळगाव शहरात १५ ते २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला. तर जिल्ह्यातील काही भागात अर्धा ते एक तासापर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. या वादळ आणि पावसामुळे जळगाव शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात वीजेची ये-जा सुरू होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासूनच्या तीव्र उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या वादळामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली.