विधान परिषद निवडणुकीत पराभव होताच महायुतीचा मोठा निर्णय; येत्या 1-2 दिवसात…

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अंतर्गत वाद आणि मतभेद चव्हाट्यावर आल्याने महायुती नेतृत्त्वात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून, पराभवाचे विश्लेषण, अंतर्गत वाद आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली जाईल.

विधान परिषद निवडणुकीत पराभव होताच महायुतीचा मोठा निर्णय; येत्या 1-2 दिवसात...
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 2:41 PM

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आला आहे. या निवडणुकीत महायुतीला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर महाविकास आघाडीने तीन जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीतील संघर्ष, वाद आणि लाथाळ्या यामुळे महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. शिंदे सेनेमुळेच हा पराभव झाल्याचा उघड आरोप भाजप आणि राष्ट्रवादीने केला आहे. तर शिंदेसेनेनेही भाजपला गद्दारीचा आरसा दाखवला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तिन्ही पक्षाचे वाद चव्हाट्यावर आल्याने आता महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसात पराभवावर मंथन करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

महायुतीचा झालेला पराभव आणि त्यानंतर वाढलेल्या महायुतीतील तणावामुळे महायुतीत अलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. येत्या एक दोन दिवसात ही बैठक पार पडणार आहे. पराभवाचे विश्लेषण, अंतर्गत वाद आणि भविष्यातील डॅमेज कंट्रोलसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...

पुणे आणि संभाजीनगरवर चर्चा

या बैठकीत खासकरून पुणे आणि संभाजीनगरमधील पराभवावर चर्चा होणार आहे. या दोन शहरांवरच अधिक फोकस राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिंदे गटाकडून अमरावतीचा मुद्दा रेटून नेण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीची मागणीही भाजपकडून केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे धंगेकर यांच्यावर बैठकी आधीच कारवाई होणार की बैठकीनंतर कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धंगेकर यांच्यावर कारवाई झाली तर मग अब्दुल सत्तार यांचं काय? असा सवाल राष्ट्रवादीकडून केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आरोप-प्रत्यारोप काय?

या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. धंगेकर यांनी केसाने गळा कापला आहे. शिंदेंनी झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई केली पाहिजे, असं बन यांनी म्हटलं आहे. तर धंगेकर यांनी राज्यातील नेतृत्त्वार जनता नाराज असून नेतृत्त्व बदल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. सर्वच जागा भाजपने लढवाव्यात का? हा अट्टाहास कशासाठी? असा सवाल करतनाच अमरावती आणि संभाजीनगरात तुमच्या नेत्यांनी आमच्या विरोधात प्रचार कसा केला? असा सवाल शिंदे सेनेचे आनंद परांजपे यांनी केला आहे. तर, मी उघडपणे शरद पवार गटाचा प्रचार केला. तेव्हा मला कोणी का बोललं नाही? असा सवाल शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us