
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सहाव्या लोहमार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. मालाड रेल्वे स्थानकालगत रेल्वेच्या जमिनीवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत झोपड्यांवर आता प्रशासनाचा हातोडा चालणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पश्चिम रेल्वेला या बेकायदेशीर झोपड्या हटवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पात ही अतिक्रमणे आड येत होती. मात्र आता न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून रेल्वेच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ व्या लोहमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मालाड परिसरात रेल्वेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणामुळे लोहमार्गाचे काम रखडले होते. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता नुकतंच यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला.
यावेळी न्यायालयाने केवळ झोपडीधारकांनाच नव्हे, तर रेल्वे प्रशासनालाही धारेवर धरले. या जमिनीवर ४० वर्षांपासून अनधिकृत बांधकामे होत असताना प्रशासन काय करत होते? असा सवाल न्यायालयाने केला आहे. या बेकायदा बांधकामांना केवळ राहणारे लोकच नाही, तर रेल्वेचे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत, असे गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
यावेळी याचिकाकर्त्यांनी आपण १९८० पासून येथे वास्तव्यास असल्याचा दावा केला होता. मात्र, सध्याच्या निकषांनुसार हे रहिवासी कोणत्याही पुनर्वसन योजनेत पात्र ठरलेले नाहीत. असे असले तरी न्यायालयाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यातील पात्र झोपडीधारकांची स्वतंत्र नोंद ठेवावी. तसेच भविष्यात त्यांना कोणत्याही गृहनिर्माण योजनेत सामावून घेता येईल का, याचा सविस्तर विचार जिल्हाधिकाऱ्यांनी करावा.
हा ६ वा लोहमार्ग पूर्ण झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्यांच्या मार्गिका वेगळ्या होतील. यामुळे विरार-चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांची गर्दीतून सुटका होईल. मालाडमधील ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर लोहमार्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.