Manikrao Kokate : ऑनलाईन रमी काय माहीत आहे का? कृषी मंत्र्यांनी सांगितली गेमची प्रोसेज
Manikrao Kokate Rummy Online Process : ऑनलाईन रमी आजतागायत आपण कधी खेळलोच नाही असे सांगतानाच कृषीमंत्र्यांनी एक घोळ घातलाच. त्यांनी ऑनलाईन रमी काय माहिती आहे का? असा सवाल करत मग...

रमी कांडामुळे महायुती सरकार अडचणीत आल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील नेत्यांनी याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. तर दुसरीकडे कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलटपक्षी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे मीडियातील बातम्यांआधारे असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. तर विरोधकांना कोर्टात खेचून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. ऑनलाईन रमी आजतागायत आपण कधी खेळलोच नाही असे सांगतानाच कृषीमंत्र्यांनी एक घोळ घातलाच. त्यांनी ऑनलाईन रमी काय माहिती आहे का? असा सवाल करत मग त्यांनी त्याची प्रक्रियाच विस्कटावून सांगितली.
कृषी समृद्धी योजनेची घोषणा
फडणवीस आणि दादांच्या वाढदिवसानिमित्ताने कृषी समृद्धी योजना लॉन्च केली. केंद्र सरकार रासायनिक खतासाठी एक लाख ९० हजार रुपये दरवर्षी सबसिडी देते. नैसर्गिक शेतीसाठी औषधे आणि बिबियाणांसाठी अनुदान देणार आहोत. सेंद्रीय शेतीत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. योजनेत त्रुटी आढळल्यास त्याचा आढावा घेऊन त्यात बदल करण्यात येईल, असे कृषीमंत्री म्हणाले.
सीडीआर तपासण्याची मागणी
याबाबत मला एकच सांगायचं आहे की हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. मी खुलासा केला आहे, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. मीडिया आणि विरोधक सारखा तोच मुद्दा का लावून धरत आहेत, असा त्रागा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणीतरी मुद्दामहून आपली बदनामी करत असल्याचा सूर त्यांनी आळवला. इतकेच काय तर विरोधकांचे सीडीआर तपासण्याची मागणीही त्यांनी केली.
ऑनलाईन रमी माहिती आहे का?
आपण आजतागायत रमी खेळलो नसल्याचा दावा कोकाटे यांनी केला. त्याचवेळी ऑनलाइन रमी काय माहीत आहे का? असा सवाल करत त्यांनी पुढे अशी माहिती दिली. “ऑनलाइन रमी खेळताना त्याला मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं या गेमशी अटॅच नाही. त्यामुळे मी सभापतींना चौकशीची मागणी करणार आहे. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. मोबाईल नंबरही देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही.”
तेव्हा नेमकं काय घडलं?
रमी नाहीच. माझी लक्ष्यवेधी होती तेव्हा. मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस करावा लागतो. किंवा फोन करावा लागतो. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. स्किप करणारा व्हिडीओ समोर आला नाही. मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही. दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला. पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही. महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देणार आहे.
व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. सभापती त्याची चौकशी करतील. त्यात काही नाही. ज्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेच्या भावना दुखावतील. मी वेडंवाकडं काही केलं नाही. शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या. दोषींचे सीडीआर चेक करा. जे कोणी भाग घेतला ते समोर येऊ द्या. कृषी मंत्री म्हणून वारंवार समोर आणलं जातं, त्याची चौकशी करावी. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे, असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला.
