आता फुल ऑन फाईट होणार, तुमचे नेते काय करणार? जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास शेवटची लढाई देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार पुकारला आहे. त्यांच्यासोबत १० ते १२ हजार आंदोलक सहभागी झाले आहेत. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आता शेवटची फाईट होणार असे स्पष्ट भाषेत सांगितले.
मुंबईवर आमचा हक्क नाही का, आर्थिक राजधानीत येऊन गोर गरीबांची लेकर सुखा-समाधानाने जगावे असं सरकारला वाटत नाही का, आम्ही पैसे मागायला आलो का, आमचे हक्काचे आरक्षण मागायला आलो आहोत, ते द्यायचं नाही. तुमची ती भाषणाबाजी आताहे पुरे झाली. आता नाही. आता फुल्ल अँड फाईट, शेवटची फाईट होणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं कर्तृत्व काय
नेते का उत्तर देत नाहीत हे आम्हालाही माहिती नाही. पण आम्हीही खंबीर आहोत. आम्ही नेत्यावर जगतच नाही. आम्ही आमच्या म्हणण्यांनुसार चालतो. कोणी मंत्री, कोणी खासदार, कोणी आमदार भेटायला आला तर आमचं काम त्यांचा सन्मान करणं. आम्ही मागे हटत नाही हा आमच्या समाजाचा प्लस पाईंट आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय कर्तृत्व आहे, हे जरा तुम्ही सांगा, असा सवाल मनोज जरांगेंनी विचारला.
मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव
मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.
आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत
आंदोलकांना त्रास दिला जात आहे, सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावं. तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हीही त्रास देऊ. मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल. हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे, आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
