
महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मुंबईतील मंत्रालयाबद्दल सध्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यातच आता मंत्रालयातीली भ्रष्टाचाराची एक धक्कादायक आणि तितकीच चित्रविचित्र पद्धत समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात चक्क कोडिंगच्या भाषेत लाच मागितली जात असल्याचे समोर आली आहे. एका स्टिंग ऑपरेशनद्वारे याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये मंत्र्यांचे पीए आणि काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर मेडिकल दुकानदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांच्या परवान्यांच्या संदर्भात हा सर्व प्रकार घडला आहे. एफडीएचे ड्रग्ज इन्स्पेक्टर जेव्हा एखाद्या मेडिकल दुकानात त्रुटी काढतात, तेव्हा त्या दुकानदाराचा परवाना निलंबित केला जातो. या निलंबनावर अपील करण्याचा अधिकार मंत्र्यांकडे असतो. पण त्या दुकानदाराने केलेल्या आरोपानुसार हे अपील खुद्द मंत्री ऐकण्याऐवजी त्यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे हेच ऐकत होते.
तक्रारदार मेडिकल चालकाने दिलेल्या पुराव्यांनुसार, मंत्रालयात पैसे मागण्यासाठी शब्दांचा वापर टाळून सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता.
या फाईलवरील स्टिकी नोट्सवर या रेषा मारल्या जायच्या. त्यानंतर राजू नावाच्या एका व्यक्तीला बोलावून त्या दुकानदाराला बाहेर नेले जायचे. त्यानंतर पैशांचा व्यवहार पूर्ण केला जाई. पैसे मिळाल्यावरच परवाना पुन्हा बहाल करण्याचा निर्णय दिला जात असे, असे स्टिंगमधून समोर आले आहे.
या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला या प्रकरणाची कोणतीही पूर्वकल्पना नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणी गैरप्रकार करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. जर माझ्या कार्यालयातील कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळला, तर मी तात्काळ माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले.
या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली आहे. मंत्रालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, वसुलीसाठी नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान गृह विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) देखील या संशयास्पद लाईन गेमची चौकशी करण्याची शक्यता आहे.