मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन काय? पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यांनी आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी ही चेष्टा असल्याचा घणाघात घातला. त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांना मोठे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन काय? पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Aug 28, 2025 | 11:31 AM

ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठ्याचं भगव वादळ मुंबईकडे घोंगावत आहे. त्यापूर्वी शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांनी आकस बुद्धीने वागू नये. मराठ्यांची मनं जिंकावी असं आवाहन केलं. एका दिवसांचं उपोषण कसं करायचं असा सवाल करत सरकार चेष्टा करत असल्याचे ते म्हणाले.

आता मागे हटणार नाही

कायद्याचे मराठा बांधव पालन करतील. आपण तशी हमी दिल्याचे त्यांनी सांगितले. पण एका दिवसाच्या उपोषण मान्य नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आता मागे हटणार नाही. आझाद मैदानावर बेमुदत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव होण्याची शक्यता आहे. तर आंदोलन शांततेत होणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी मराठा बांधवांना संयम ठेवण्याचे आवाहन केले. कोणताही कायदा तोडू नका. कुणाला त्रास होईल असे वागू नका. गडबड गोंधळ करू नका. जातीचं, समाजाचं नाव खाली जाईल असं वागू नका असे त्यांनी आवाहन केले. पण बेमुदत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी ठणकावले.

असा टाकला डाव

सन्माननीय फडणवीस साहेब तुम्हाला आदरपूर्वक सांगतो की तुम्ही आम्हाला कोणतीही अट घालू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. कोट्यवधी मराठा लोक हे मुंबईच्या वेशीला वाटी लावायला येत आहेत. आंदोलनात अनेक जण येतील. तर काही मराठे पुन्हा गावी जातील. त्यांना गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात आंदोलन करायचे आहे. त्यांना तिथे तयारी करायची आहे. त्यामुळे अटी आणि शर्ती फडणवीस सरकारने मागे घ्याव्यात अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

काय खेळली चाल?

आझाद मैदानावर 5000 मराठा आंदोलकांना परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यावर आता जरांगे यांनी मोठी चाल खेळली आहे. आंदोलन एका दिवसाचे होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. तर मराठा आंदोलक इतर मैदानावर थांबतील. हे पाच हजार मराठा आंदोलक माघारी जातील, त्यांच्याऐवजी अजून 5000 हजार आंदोलक नव्याने येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्तींचे पालन होईल. मुंबईंच्या वेशीवर मराठे असतील. आणि एक जत्था गेल्यानंतर दुसरा जत्था आझाद मैदानावर पोहचेल, अशी तजवीज होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ध्वनीत केले. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की. त्यातच फडणवीस सरकार अटी आणि शर्ती मागे घेईल असा विश्वासही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.