वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत द्या, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मातृभाषेचा सन्मान प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्याने केलेले हे आव्हान एका अर्थी एक मोठी संधी आहे | Ashish Shelar

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत द्या, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Ashish Shelar
| Updated on: Feb 08, 2021 | 10:21 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भाषणामध्ये देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभा करण्यात याव्यात असे आवाहन देशाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा दोन संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा अशी विनंती करणारे पत्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. (Start Marathi Medical and engineering college in Maharashtra)

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मभूमीत होते आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी भाषेतील योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वी मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण संस्था उभ्या राहिलास भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मानच होईल. त्यासोबतच महाराष्ट्राचा 75 वा वर्धापन दिन आपण ज्यावेळी साजरा करू त्यापूर्वी या दोन संस्था उभा राहिल्यास मराठी भाषेला एक वेगळा आयाम मिळू शकेल.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मातृभाषेचा सन्मान प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्याने केलेले हे आव्हान एका अर्थी एक मोठी संधी आहे. त्यामुळे तातडीने या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत याबाबतही तातडीने केंद्र सरकारशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रात सांगितले आहे.

समृद्धी महामार्गालगत संस्थांची उभारणी करा

मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग हा एक विकासाचा महामार्ग वेगाने उभा राहतो आहे या महामार्गाच्या लगत काही जागा राज्य सरकारने विविध व्यावसायिक उपयोगासाठी निश्चित केल्या आहेत जर अशा प्रकारच्या दोन संस्था या महामार्गाच्या लगत संरक्षित जागेवर उभा राहिल्यास या संस्थानसाठी लागणारी जागा ही तातडीने उपलब्ध होऊ शकेल व कनेक्टिविटी राहू शकेल, असा प्रस्वात आशिष शेलार यांनी पत्राद्वारे मांडला आहे.

व्हीजेटीआय, आयआयटी या सारख्या नामांकित संस्थांशी समन्वय साधून संलग्न करून तसेच केईएम, जे. जे. यासारख्या वैद्यकीय संस्थांशी संलग्न करून या संस्था मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी उभे राहिल्यास भविष्यात मराठीतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीच्या हातून मराठीची सेवा घडेल.

मातृभाषा ही “ज्ञानभाषा” आणि “व्यवहार भाषा” व्हावी यादृष्टीने पंतप्रधानांनी केलेले हे आव्हान महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने उपाय योजना करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच या बाबत एक अभ्यास गट तातडीने नियुक्त करून जागतिक पातळीच्या आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या संस्था उभ्या करुन मराठी भाषेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल सरकारने उचलावे ही विनंती आशिष शेलार यांनी या पत्रात केली आहे.

(Start Marathi Medical and engineering college in Maharashtra)