VIDEO: अंगावर याल तर शिंगावर घेऊच; महापौर किशोरी पेडणेकर कडाडल्या

| Updated on: Jun 17, 2021 | 10:50 AM

दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे.

VIDEO: अंगावर याल तर शिंगावर घेऊच; महापौर किशोरी पेडणेकर कडाडल्या
mayor kishori pednekar
Follow us on

मुंबई: दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराच भाजपला दिला आहे. (mayor kishori pednekar warns bjp over agitation at shivsena bhavan)

शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

ते शिवसेना भवन आहे हे विसरू नका

शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचे भाजपचे आंदोलन निषेधार्ह आहे. शिवसेनेची राम जन्मभूमीबद्दल भूमिका काय आहे हे कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही . शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्याआधी आणि बनल्यानंतरही राम जन्मभूमीला भेट देऊन आले आहेत, असं सांगतानाच तुम्ही अॅक्शन कराल तर त्याला रिअॅक्शन मिळणारच. भाजपने प्रतिकात्मक आंदोलन केल असतं तर चाललं असतं. राणीच्या बागेत फिरायला गेल्यासारखं आंदोलन त्याठिकाणी केलं. ते ठिकाण शिवसेनाभवन आहे हे विसरून चालणार नाही, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला आहे.

रस्त्यावर येण्याची गरज का भासली?

मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी. इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली?, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.

शिवसेनेची गुंडागर्दी योग्य नाही

दरम्यान, या राड्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. (mayor kishori pednekar warns bjp over agitation at shivsena bhavan)

संबंधित बातम्या:

शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!

शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, सेना भवनसमोर राडा; अनेकांची धरपकड!

‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’ अतुल भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

(mayor kishori pednekar warns bjp over agitation at shivsena bhavan)