महापौर किशोरी पेडणेकर ठणठणीत, दोन दिवसानंतर ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज

| Updated on: Jul 20, 2021 | 4:44 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (20 जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर ठणठणीत, दोन दिवसानंतर ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज
Follow us on

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज (20 जुलै) परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते. (Mayor Kishori Pednekar’s health condition improves, discharged from Global Hospital)

रविवारी (18 जुलै) सकाळी किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांना शनिवारी रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने रविवारी सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आज त्या सुखरुप घरी परतल्या आहेत.

स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचेदेखील आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

अ‍ॅक्टिव्ह महापौर

महापौर किशोरी पेडणेकर या सर्वात अॅक्टिव्ह महापौर म्हणून ओळखल्या जातात. कोविड संकट काळात त्यांनी स्वत: रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयीन व्यवस्थेची पाहणी केली होती. स्वत: नर्स असल्याने त्यांनी रुग्णांची सेवा करण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच अनेक बैठका घेऊन आणि तातडीने उपाययोजना करून त्यांनी मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात आणली. डॉक्टरांचं मनोबल उंचावण्यापासून ते रुग्णांच्या भेटीगाठी घेण्यासह अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचं कामही त्यांनी या काळात केलं आहे. मुंबईत कोणतीही घटना घडल्यास पेडणेकर स्वत: त्या ठिकाणी हजर असतात. कामाची व्यस्तता, सततची धावपळ आणि दगदग यामुळेही त्यांची प्रकृती बिघडली असावी, असं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या

आदी गोदरेज, इक्बाल सिंह चहल, उज्ज्वल निकम यांच्यासह 31 मान्यवरांना ‘मुंबई रत्न’, राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा; जयंत पाटलांच्या सूचना

(Mayor Kishori Pednekar’s health condition improves, discharged from Global Hospital)