हिंदी सक्तीविरोधात मनसे-ठाकरे गटाच्या मोर्चाबद्दल नवीन अपडेट समोर, पोलिसांच्या अटी-शर्थी काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेची सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे समर्थन मिळाल्याने हा मोर्चा अधिक बळकट झाला आहे. पोलिसांकडून मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत ५ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. आता या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेच्या नेत्यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. आता याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मनसेने हिंदी सक्तीविरोधात पुकारलेल्या मोर्चासंदर्भात मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
मोर्चाबद्दल पोलीस काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार आणि अटींनुसारच हा मोर्चा काढावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी किंवा रस्त्यांवर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई आहे. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात निघणारा मोर्चाही न्यायालयाच्या अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच काढण्यात यावा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
आता याबद्दल मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर त्याला सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा हा कौल बघून सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागेल, असे त्यांना वाटते. जर सरकारने हा निर्णय मोर्चाआधी मागे घेतला, तर आपल्याला आनंदच होईल, असे नितीन सरदेसाई म्हणाले.
युतीबद्दलचा निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील
अनेकदा याबद्दल बोलूनही कोणताही निर्णय घेतला जात नाही. हे आतापर्यंत दिसून आले आहे. हिंदी सक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या मनसेच्या डोक्यात हिंदी सक्ती विरोधात जनमत आणि लोकांची खदखद सरकारसमोर आणण्याची प्रमुख बाब आहे. ती सक्ती रद्द करणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. मराठी माणसावर अन्याय होत असेल आणि त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याविरुद्ध उभे राहणे हे मनसे स्थापनेपासून करत आली आहे. युतीबद्दलचा निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील आणि याबाबत मला अद्याप कोणतीही कल्पना नाही, असेही नितीन सरदेसाईंनी सांगितले.
मनसेने यापूर्वी जेव्हाही मोर्चा किंवा सभा घेतल्या आहेत, तेव्हा त्यांची अनेकदा अडवणूक झाली आहे. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येऊन भावना व्यक्त करणे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही. प्रशासकीय कारणे दाखवून आपल्या विरोधात जे काही होत आहे, ते थांबवण्याचा प्रयत्न असतो. मात्र, यावेळी लोकांच्या भावना पाहता सरकार देखील याला विरोध करणार नाही. विविध राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य लोकांना, ज्यांना मोर्चाला यायचे आहे, पण त्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्यामुळे उत्साहात वाढ झाली आहे. लोकांच्या मनातील प्रश्न ओळखून त्यांना त्याची उत्तरे देण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. सरकारमधील दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी दिलेली विधाने पाहता, सरकारमधील इतर मंत्र्यांना त्यांचे म्हणणे समजू शकले, तर अधिक बरे होईल, असेही नितीन सरदेसाई यांनी नमूद केले.
