
दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस भारतात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. याच मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) युगात मराठी भाषेला सक्षम आणि शक्तिशाली करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त उच्च दर्जाचा डेटा (Data) निर्माण करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी भाषेसह एआय डिजीटल माध्यम यावर भाष्य केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी डेटाचे महत्त्व सांगितले आहे. “जमिनीत शेती शोधल्यापासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत शक्तीचे स्रोत बदलत गेले. डिजिटल युगात डेटा ही सर्वात मोठी शक्ती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ज्या भाषांमधून जास्तीत जास्त डेटा तयार होईल, ती भाषा शक्तिशाली ठरेल”, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी मराठी भाषिकांना ५ मुख्य सल्ले दिले आहेत. मराठी भाषा डिजिटल जगात ज्ञानाची वाहक बनवायची असेल तर त्यांनी काही उपाय सुचवले आहेत.
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल… pic.twitter.com/ClUI3rJrwm
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2026
या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी अँथ्रोपिक (Anthropic) कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल पाटील यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कमी होण्याची भीती असली, तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. आता आपल्याला मराठी भाषेतून ज्ञान मिळवण्याबाबतचे सार्वभौमत्व मिळवणे शक्य आहे, ही संधी सोडू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.