हिंदीविरोधातील मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी; पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे सत्र सुरू

हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेस आणि शरद पवार गटानेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

हिंदीविरोधातील मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी; पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे सत्र सुरू
| Updated on: Jun 29, 2025 | 12:03 PM

राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सूर जुळून आले. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात दोघंही सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) मनसेच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहेत. दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक झाली. याआधी शनिवारी नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर विधानसभामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मोठी बैठक झाली होती. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठिकाठिकाणी मनसेकडून पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत.

‘आम्ही अशा अनेक पोस्टर्स लावल्या आहेत. समाजातल्या विविध घटकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सकारात्मक प्रतिक्रियांच्या पोस्टर्स बनवल्या आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या दोन-अडीच महिन्यात मराठी भाषेबाबत किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात आपली मतं मांडलेली आहेत. त्यावर सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. नागरिकांना कळाव्यात या उद्देशाने त्यांचे बॅनर लावलेले आहेत. भाजपचे आदिवासी विकास मंत्रीसुद्धा म्हणाले की मराठीशिवाय दुसरी भाषा येतच नाही. माझ्या आईने मला मराठी शिकवलेली आहे, अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया आहे. याचा एकंदर अर्थ हाच होतो की आमच्या भूमिकेला कुठेतरी साधर्म्य असणारी त्यांची प्रतिक्रिया आहे. ते जरी भाजपाचे मंत्री असले तरी त्यांचं अंतर्मन आमच्या भूमिकेशी सहमत आहे,” असं मनसेचे यशवंत किल्लेदार म्हणाले.

“असे बॅनर आम्ही रोज 5 तारखेपर्यंत लावणार आहोत. त्याचसोबत पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतच आहोत. या मोर्चामध्ये नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील याबाबत चर्चा होते. विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेतली पाहिजे. सार्वजनिक उत्सव मंडळ, क्रीडा मंडळ, सांस्कृतिक मंडळ, शाळा, मुख्याध्यापक, पालक, नागरिक या सर्वांना त्यात सहभागी करून घ्यायचंय. घरोघरी जाऊन त्यांना कसं सांगता येईल, पत्रकं कशी वाटता येईल, या स्वरूपाचं मार्गदर्शन या बैठकीमध्ये केलं जातं,” अशी माहिती किल्लेदार यांनी दिली.