‘महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, मुंबई-ठाणे मनपा पाठोपाठ विधानसभेवर भगवा फडकेल’, संजय राऊत यांची भविष्यवाणी

| Updated on: Nov 28, 2022 | 12:08 AM

"विधानसभेवर भगवा फडकेल. मुंबईच काय ठाणे सुद्धा मी सांगतो, शे-पाचशे लोक गेली आहेत. पण मतदार कुठे जात नाही. तो वाट बघतोय", असा दावा संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, मुंबई-ठाणे मनपा पाठोपाठ विधानसभेवर भगवा फडकेल, संजय राऊत यांची भविष्यवाणी
संजय राऊत
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : “या महाराष्ट्रामध्ये परत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. हे मी आता इथून सांगतोय. विठोबाच्या साक्षीने सांगतोय, परत शिवसेना सत्तेवर येईल”, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. “महानगरपालिका निवडणूक आहेत. माझ्या मनात अजिबात शंका नाही किती प्रयत्न करू द्या, ही जी मशाल तिकडे दिसतेय, ती मशाल आणि भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर डौलाने फिरताना आणि फडकताना दिसेल”, असं संजय राऊत म्हणाले.

“विधानसभेवर भगवा फडकेल. मुंबईच काय ठाणे सुद्धा मी सांगतो, शे-पाचशे लोक गेली आहेत. पण मतदार कुठे जात नाही. तो वाट बघतोय”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“मी आर्थर रोड जेलमध्ये होतो. त्या साडेतीन महिन्यात मला काय दिसलं? तुरुंगात मतदान घेतलं असतं तर 90 टक्के मत शिवसेनेला पडले असते”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

“आमचे सगळे देव-देवता महाराष्ट्रातच आहेत. आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही. आम्ही कोंबडे-बकरे कापतो, रेडे कापत नाही”, असा टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला.

“जोपर्यंत कोकण शिवसेनेच्या पाठीशी आहे तोपर्यंत किती शिंदे आणि मिंदे आले आणि गेले तोपर्यंत शिवसेनेचा कोणी बालही वाकडं करू शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“लोक म्हणतात शिवसेना फुटली. कुठे फुटली? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी आख्खं बुलढाणा रस्त्यावर उतरलं होतं”, असं देखील राऊत म्हणाले.

“दोन-पाच, दहा लोक गेले-आले. सोडून द्या. इकडे तुफान आलेलं आहे. हे तुफान बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं तुफान आहे. शिवसेनेची तिसरी-चौथी पिढी काम करतेय. त्यामुळे शिवसेनेला अंत नाही. येतील लाटा जातील लाटा तरी शिवसेनेच्या लाटेला अंत नाही”, असा दावा त्यांनी केला.

“मला अटक करायला ईडीची लोक आले, कोर्टाने सांगितलं खोटी केस आहे, यांचा काही संबंध नाही. किती दिवस तुरुंगात ठेवतात ते ठेवा. पण मी शिवसेना सोडणार नाही”, असं राऊतांनी ठासून म्हटलं.

“कोणाच्या दबावाखाली शिवसेनेचा त्याग करणं, त्यापेक्षा मरण पत्करेल! असंख्य शिवसैनिक जन्म देतात. नेता गेला म्हणून काय झालं? तुरुंगात जायची वेळ आली म्हणून जे पळून गेले त्यांना इतिहास क्षमा करणार नाही. पळकुट्याच्या पाठी महाराष्ट्र कधी राहत नाही”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

“ज्याने आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचं नाव विशाल राहत नाही. हा या महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे. ज्याने शिवसेनेचा हात सोडला ते बुडाले. बाळासाहेबांनी त्यांना शेंदूर फासले आणि त्यांना देवपण दिलं आणि शेंदूर फासलेला दगड आता स्वतःला देव म्हणून फिरवत आहेत. फार काळ चालणार नाही”, अशी टीका त्यांनी केली.