
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज दुपारी चार वाजता निकाल येईल. त्यानंतर आम्ही आमची अधिकृत भूमिका मांडू. पण त्याआधी मी एवढंच सांगू इच्छितो की, निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलं आहे. विधानसभेमध्ये 67 % बहुमत आमच्याकडे आहे. तर लोकसभेत 75 % बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने आम्हाल अधिकृत शिवसेना पक्षाचा दर्जा दिला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज येणारा आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा दावा केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. काही लोक मॅच फिक्सिगचा आरोप करतात. मॅच फिक्सिंग म्हणजे काय? तेव्हा यांचे लोक विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते. त्यावर आम्ही आक्षेप घेतला का?, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
त्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माझ्याकडे आले. ते त्यांच्या अधिकृत वाहनातून आले. ते रात्री लपून आले नाहीत. ते दिवसा उजेडामध्ये आले. त्यांच्या मतदारसंघात जे काम सुरू आहे. कोस्टल रोडचं काम सुरू आहे. त्याबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली. त्या रोडच्या कामावर आमची चर्चा झाली. चोरांच्या मनात चांदणे अशी यांची गत झाली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली यवतमाळ दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अपात्रेबाबतचा आजचा निर्णय हा मेरीटवर होईल अशी मला अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आल्यावर आमची भूमिका मांडू. त्यांच्या बाजूने निकाल लागला की न्यायव्यवस्था संस्था चांगली. नाही लागली की न्यायव्यवस्था वाईट, असं कसं चालेल? बहुमत आमच्याकडे आम्हीच शिवसेना, घटनाबाह्य आम्ही नाही. तर ठाकरे गटच घटनाबाह्य आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे रोज सरकार पडणार असं म्हणतात… अकलेचे तारे तोडतात. आमचा व्हिप आजही त्यांना लागू आहे. मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप करतात. पण जर मॅच फिक्सिंग झाली असती तर राहुल नार्वेकर हे रात्री आले असते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.