मुंबई | 16 मार्च 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरू आहे. ही यात्रा सध्या अंतिम टप्प्यात आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते सध्या महाराष्ट्रात पोहोचले आहेत. उद्या या यात्रेची सांगता होणार आहे. आज सकाळी धारावीतील खादी पूल इथून ही यात्रा निघाली आहे. त्यानंतर स्थानिकांशी भेटीगाठी करत ही भारत जोडो न्याय यात्रा पुढे सरकत आहे. सध्या भारत जोडो न्याय यात्रा ही कळवा- मुंब्रा भागात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे राहुल गांधी यांचं स्वागत करत आहेत. पुढे भांडूप-मुलुंड मार्गे धारावीत ही यात्रा पोहोचेन. त्यानंतर माटुंगा रोड फ्लायओव्हरला राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाईल. दादरच्या चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे. बीकेसी मैदानावर हे सगळे नेते थांबणार आहेत.
मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेतेही उपस्थित राहतील. या शिवाय इंडिया आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते या सभेला उपस्थित असतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव हे देखील उपस्थित असतील.
मुंबईतील भांडूप एलबीएस रोडपासून धारावीपर्यंत राहुल गांधी यांचा रोडशो असणार आहे. या सगळ्या रस्त्यावर जोरदार बॅनरबाजी सध्या पाहण्यात येत आहे. मुंबईच्या धारावी परिसरातील सगळे रस्ते राहुल गांधी यांच्या स्वागताच्या बॅनरने भरून गेलेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सध्या जोर धरतोय आणि याचा विरोध काँग्रेसने केलाय.
राहुल गांधी यांनी देखील बऱ्याचदा आगामी यांच्या विरोधात लोकसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. त्याच अनुषंगाने धारावीत लोकांना न्यायाचे घर मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. राहुल गांधींच्या रोडशो ला गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.