Diwali Fire Incidents 2026 : दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई ते भिवंडी पर्यंत अग्नितांडव, कुठ-कुठे घडल्या आगी लागण्याच्या घटना? जाणून घ्या
Diwali Fire Incidents 2026 : दिवाळीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा प्रकारच्या फटाक्यांवर नियंत्रण आवश्यक आहे. इमारतींच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये आणि मोकळ्या जागेत फटाके फोडू नयेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागरिकांना आवाहन.आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश.

दिवाळीच्या पहिल्यादिवशी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, भिवंडी तसचं राज्यात इतरत्र आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.ठाण्यात रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून घाबरलेल्या नागरिकांना धीर दिला. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन परिसरातील कार्लाइल इमारतीला भीषण आग लागली. रात्री नऊच्या सुमारास आठव्या मजल्यावर लागलेली आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. अग्निशमन दलाकडून तब्बल साडेपाच तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. रात्री अडीचच्या सुमारास ऑपरेशन पूर्ण करण्यात यश आलं. तब्बल 50 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या गाडीच्या मदतीनेही नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं.
नागरिकांना धीर देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने फोनवर संपर्क साधण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोठा मानसिक आधार मिळाला. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान ड्रोनचा वापर करण्यात आला. आगीची परिस्थिती आणि अडकलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली.TDRF, ठाणे अग्निशमन दलासह मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. दिवाळीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा प्रकारच्या फटाक्यांवर नियंत्रण आवश्यक आहे. इमारतीच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये आणि मोकळ्या जागेत फटाके फोडू नयेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं.
विरारमध्ये किती ठिकाणी लागली आग?
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाक्यांमुळे विरार मध्ये तीन ठिकाणी भीषण आगी लागण्याच्या घटना घडल्या. विरार पूर्व मोहक सिटी, विरार पश्चिम ग्लोबल सिटी कॉस्मो, एचडीआयएल सोसायटी या परिसरात फटाके आणि घरातील दिव्या मुळे भीषण आग लागली. विरारच्या एचडीआयएल सोसायटी मध्ये एका बंद घरात भीषण आग लागली. आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूच्या आणि वरच्या घरांना ही फटका बसला. सुदैवाने कोणत्याही आगीच्या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहचून आग विझवली.
पाच खोल्या जळून खाक
रविवारी रात्री दहा साडेदहाच्या सुमारास गौरीपाडा या परिसरात तळ अधिक एक मजली चाळ असलेल्या इमारती लगत असलेल्या भंगार गोदामात सुरुवातीला आग लागली.त्यानंतर आग झपाट्याने वाढत गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरील घरापर्यंत पोहोचली.त्यामुळे या आगीमध्ये या चाळीतील पाच खोल्या जळून खाक झाल्या.सुदैवानं यापैकी तीन घरे रिकामी होती तर दोन घरातील कुटुंबीयांना ही आग लागताक्षणी स्थानिकांनी बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आगीचे कारण अजून समोर आलेले नाही.
डोंगरी पोलीस स्थानकाच्या समोर भीषण आग
डोंगरी पोलीस स्थानकाच्या समोर असलेल्या दुकानांना आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पदाधिकारी दाखल झाले. फायर ब्रिगेडने ही आग विझवली.
डोंबिवलीत कुठे लागली आग?
डोंबिवली पूर्वेतील 90 फूट रोडवरील मंगेशी डेझेल फेज तीन गृहसंकुलातील घटना. सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या गॅलरीमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
