Mumbai Local Megablock : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर जंबो मेगाब्लॉक आहे. ट्रान्स-हार्बरवरील लोकल सेवा आज ठप्प राहणार आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वेळापत्रक नक्की तपासा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Local Megablock : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
mumbai local
| Updated on: Dec 14, 2025 | 8:14 AM

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अत्यावश्यक असल्यास प्रवास करावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे विशेष आवाहन केले आहे.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. वीकेंडच्या दिवशी हा मेगाब्लॉक असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात येणार आहेत. तसेच काही मार्गांवर सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवरील जलद मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत, सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यानंतर त्यात्यांच्या निश्चित स्थानकांपर्यंत पोहोचतील. तर ठाणे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या बदलामुळे जलद लोकल नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा धावण्याची शक्यता आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे रद्द

ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना सर्वाधिक गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण येथे सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ही ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान याचा फटका बसणार आहे. ठाणे–वाशी–नेरूळदरम्यान धावणारी ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा या कालावधीत पूर्णपणे रद्द राहणार आहे. प्रवाशांनी या वेळेत प्रवास टाळावा किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवर धीम्या मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक १ ते ४ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. ज्यामुळे गाड्यांच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान आजच्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा. अत्यावश्यक असल्यास रेल्वेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. तसेच पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.