Mumbai Local : धक्कादायक, मुंबईत धावत्या लोकलमध्ये अचानक मोटरमनची प्रकृती ढासळली, अस्वस्थ वाटू लागलं, मग…

Mumbai Local : गाडी चालवताना ड्रायव्हरला चक्कर येण, ह्दयविकाराचा झटका अशा घटना आतापर्यंत आपण चारचाकी वाहनांच्या बाबतीत ऐकल्या आहेत. पण आता मुंबईत धावत्या लोकलमध्ये असा प्रकार घडलाय, तो ही मोटरमनच्या बाबतीत.

Mumbai Local : धक्कादायक, मुंबईत धावत्या लोकलमध्ये अचानक मोटरमनची प्रकृती ढासळली, अस्वस्थ वाटू लागलं, मग...
Mumbai Local
| Updated on: Oct 04, 2025 | 8:34 AM

गाडी चालवताना ड्रायव्हरला अचानक चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं, ह्दयविकाराचा झटका यामुळे आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये ड्रायव्हरसह वाहनातील इतर प्रवाशांच्या जिवीताला सुद्धा धोका असतो. आतापर्यंत आपण अशा घटना चारचाकी वाहनांच्या बाबतीत ऐकल्या आहेत. पण आता मुंबईत धावत्या लोकलमध्ये असा प्रकार घडलाय, तो ही मोटरमनच्या बाबतीत. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल प्रवासादरम्यान शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सीएसएमटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र मोटरमनने प्रसंगावधान राखून बेलापूर रेल्वे स्टेशनवर लोकल थांबवली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ही लोकल बेलापूर स्टेशनवर वीस ते पंचवीस मिनिटं थांबवण्यात आली होती.

आता मोटरमनची प्रकृती कशी आहे?

घटना रात्री 11:00 वाजता घडलेली आहे. सीएसएमटी ते पनवेल लोकल बेलापूर स्थानकात आल्यावर मोटरमनला अचानक अस्वस्थता जाणवली. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी त्वरित बेलापूर स्टेशनवर गाडी थांबवली. या दरम्यान मोटरमनला प्राथमिक उपचार देण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून दुसऱ्या मोटरमनची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ही लोकल पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान मोटरमनला एमजीएम (MGM) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकलमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात

मुंबईत लोकल सेवेला जीवनवाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबईत लोकलने प्रवास करतात. लोकलची वेळ चुकली, तर संपूर्ण दिवसाच वेळापत्रक बिघडतं. त्यामुळे मुंबईत लोकल प्रवासाच महत्वाच साधन आहे. एका लोकलमधून शेकडो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मोटरमनवर असते. धावत्या लोकलमध्ये अचानक मोटरमनची प्रकृती बिघडल्यानंतर त्या मोटरमनने जे प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतला, तो खरोखरच योग्य होता. कारण ट्रेनमध्ये त्यावेळी बरेच इतर प्रवासी सुद्धा होते.