
मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र आता या प्रवाशांना शनिवारी सायंकाळी आणि रविवारी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. हार्बर मार्गावर तब्बल साडे 14 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होणार आहे. हा ब्लॉक कधी आणि कोणत्या कामासाठी घेतला जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळक नगर या स्थानकांदरम्यान नवीन मार्गिकेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.30 तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
हार्बर मार्गावरील हा मेगा ब्लॉक शनिवारी रात्री 11.05 ते रविवारी दुपारी 1.35 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात हार्बर मार्गावरील वडाळा रोड – मानखुर्द दरम्यान नव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. या काळात वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकलसेवा बंद राहणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10.20 ते रविवारी दुपारी 2.19 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवारी रात्री 10.07 वाजल्यापासून रविवारी दुपारी 12.56 वाजेपर्यंत पनवेलवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गांवर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील 18 मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी मध्यरात्री 00.30 ते पहाटे 4.30 या काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या राममंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच ब्लॉकच्या कालावधील काही गाड्या रद्द केल्या जाणार आहे.